शहरासह जिल्ह्यात मान्सूनने मंगळवारी दमदार हजेरी लावली. यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने नदीवरील राजाराम आणि शिंगणापूर हे दोन्ही बंधारे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पावसापासून सुरक्षेसाठी रेनकोट, छत्री घेण्यासाठी बाजारपेठेतील दुकानांत गर्दी दिसून येत आहे.

सोमवारी दिवसभर ढगांनी आकाश भरले होते तरी पावसाने चकवा दिला होता. त्यानंतर रात्री उशिरा पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. दरम्यान, शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे.

कोल्हापूर शहर ज्या पंचगंगा नदीच्या काठावर वसले आहे. या नदीच्या उगम स्थानात ज्या उपनद्या येतात त्या पश्चिम घाटामाथ्यावरील राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्याच्या डोंगररांगा भागात मुसळधार पाऊस सुरू असून सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर व बावडा येथील राजाराम बंधारे पाण्याखाली गेल्याने त्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी राजाराम बंधाऱ्यांची पाणी पातळी १३.९ फूट होती.

कसबा बावडा उपनगरातील नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे कसबा बावडा ते वडणगे या मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे.

सात बंधारे गेले पाण्याखाली

मंगळवारी सायंकाळी ६ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फूट होती. त्यानंतर राजाराम, शिंगणापूर, रुई, रशिवडे, हळदी, यवलूज व सुर्वे हे ७ बंधारे पाण्याखाली गेले.

नालेसफाईचा दावा फोल

शहरातील रामानंदनगर, जरगनगर, रेणुका मंदिर परिसर, शास्त्रीनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, कुंभारवाडा परिसरात चिखलाचे साम्राज्य राहिले. नाल्यामधील पाणीही वाढल्याचे दिसत होते. सखल भागात तुंबलेले पाणी काढण्यासाठी परिसरातील काही तरुण, कार्यकर्ते प्रयत्न करीत राहिले. त्यामुळे महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला.