राजू शेट्टी यांची टीका; शेतकरी नेते पाठीशी

शेतकऱ्यांच्या संपावर जाण्याच्या कृतीचे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांनी स्वागत करून त्याला पाठबळ दिले आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन शासनाने वेळीच योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची आग भडकत राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहनही केले. शेतकऱ्यांनी संपावर जाणे ही राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब असल्याची टीका केली आहे. सरकारने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकरी आता चिडलेला असून, त्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. हा संप म्हणजे अराजकतेची सुरुवात असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, कर्जमाफी करावी, हमीभाव मिळावा हीच आमची मागणी आहे. त्या सरकारने मान्य कराव्यात. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. गरज नसताना माल आयात-निर्यात करायचा, कर वाढवायचा हे कसले धोरण, असा सवाल शेट्टी यांनी केला. ‘मन की बात’मध्ये डाळीचे उत्पादन वाढवायला सांगायचे आणि दुसरीकडे उत्पादन झाल्यानंतर त्यांना दर द्यायचा नाही, याला काय म्हणायचे, असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता विचारला.

शेतकऱ्यांना सतावणाऱ्या असंतोषाला या संपातून वाट फुटत आहे. त्याला माझा पािठबा आहे, असा उल्लेख करून शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अजित नरदे म्हणाले, संप करताना केलेल्या मागण्या साधार आहेत का हेही पाहिले पाहिजे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी हीच अशास्त्रीय बाब आहे. बिनव्याजी कर्ज, मोफत वीज अशा अर्थशास्त्राशी विसंगत मागण्या आम्ही केल्या नाहीत. संप करताना यावर विचार झाला नसला तरी आंदोलनाची धग पाहता सरकारला याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसल्याचे त्यांनी सांगितले.

रघुनाथदादांचा इशारा

या आंदोलनात सक्रिय असलेले शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्यभर संपाला मिळत असलेला अभूतपूर्व पािठबा शेतकऱ्यांच्या मनातील भावना दर्शवत आहेत. त्याचा विचारच करायचा नाही अशी शासनाची भूमिका असेल तर ही परिस्थिती आणखी चिघळू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

पुणतांबे येथे जाऊन आंदोलनाच्या बांधणीत उतरलेले बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी एका पुणतांब्यातून सुरू झालेली संपाची तीव्रता राज्यभर पसरली असून, त्यातून शेतकऱ्याच्या मनातील असंतोष बाहेर पडत असल्याचे सांगितले. आता आम्ही आमच्यातील आत्महत्यांचे भावनिक दर्शन न करता लढा देत असून त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना चिरडण्याचे तेवढे बाकी- राज ठाकरे</strong>

शेतकऱ्यांच्या जिवावर सत्तेत आलेला भाजप आज शेतकरीद्रोही बनला आहे. शेतकऱ्यांच्या संपाआडून हिंसाचाराचा डाव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे विधान म्हणजे संप चिरडण्याचा सरकारचाच डाव असून संप कशाला चिरडता आता शेतकरीच चिरडा, असा घणाघाती हल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांचा संप चिरडण्याचा उद्योग केला तर मनसे ते खपवून घेणार नाही असा इशाराही राज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली होती एवढेच नव्हे तर शतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कृषीमंत्र्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली होती. आता सत्तेत आल्यानंतर भाजपचा खरा चेहरा समोर येत आहे अशी टीका राज यांनी केली.