राजू शेट्टी यांचे मत

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीतून तयार झालेले कार्यकत्रे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक गद्दारी करण्याचा विचारसुद्धा मनात येणे शक्य नाही, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दुसऱ्याच्या पक्षातून चांगले लोक आपल्या पक्षात आणायचे स्वप्न रंगवणाऱ्यांचे केवळ स्वप्नरंजन होईल, असे म्हणत त्यांनी भाजपला चिमटा काढला.

खोत यांच्याशी भाजपची सलगी वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी बोलताना शेट्टी म्हणाले, की राज्य मंत्रिमंडळामध्ये खोत यांचा समावेश झाला आहे. स्वाभिमानी पक्षाचा व संघटनेचा घटक म्हणून कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना स्वाभिमानीच्या कोटय़ातून त्यांना विधान परिषद सदस्यत्व मिळाले. स्वाभिमानीच्या वतीने त्यांची एकमेव नावाची शिफारस करण्यात आली होती. सदाभाऊ हे चळवळीतून तयार झालेले कार्यकत्रे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक गद्दारी करण्याचा विचारसुद्धा येणे शक्य नाही. तेव्हा दुसऱ्याच्या पक्षातून चांगले लोक आपल्या पक्षात आणायचे स्वप्न रंगवणाऱ्यांचे केवळ स्वप्नरंजन होईल. अशी स्वप्ने पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास होईल, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

मंत्रिमंडळामध्ये खोत हे ‘स्वाभिमानी’चे प्रतिनिधित्व करत आहेत. ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, असे प्रशस्तिपत्रक देऊन शेट्टी यांनी त्यांच्यावर विश्वास प्रकट केला. ते म्हणाले, की कोणी कितीही वावडय़ा उठवल्या तरी खोत हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेले कार्यकत्रे असल्याने गद्दारी त्यांच्या रक्तातच नाही. आमची संघटना खिळखिळी करण्याचा सर्व जण प्रयत्न करतात. असा प्रयत्न नव्याने होतो आहे, असे नव्हे; पण फूट पाडू पाहणाऱ्यांना अद्याप यश आले नाही. कोणी कितीही मोहजाल टाकले तरी त्याला ते बळी पडणार नाहीत.