X

भाजप मित्राला गुलामासारखे वागवते, निर्णय घेण्यापूर्वी विचार करा; राजू शेट्टींचा राणेंना सल्ला

सरकारवर पुन्हा डागली तोफ

भाजप हा स्वार्थी पक्ष असून, गरज असेल तेव्हा जवळीक साधतो तर गरज सरल्यावर मित्राला गुलामासारखी वागणूक देतो, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी मांडले आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी भाजपला साथ देण्यापूर्वी आम्हाला आलेला अनुभव पाहून निर्णय घ्यावा, असा सल्ला शेट्टी यांनी राणेंना दिला. मराठवाड्यातील यवतमाळमध्ये पिकांवर औषध फवारणीमुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेला कृषी विभाग जबाबदार असल्याची टीका करत खासदार राजू शेट्टी यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शेतकऱ्यांना उपलब्ध औषधांची माहिती देणे गरजेचे होते. मात्र त्याठिकाणी असे घडले  नाही. याबाबत कृषी सेवा केंद्रांना देखील आपली जबाबदारी झटकता येणार नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.कर्जमाफीच्या मुद्दावरून शेट्टी यांनी राज्य शासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, भाजप-सेना सरकार कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळते आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. कर्जमाफीच्या योजनेला ‘शेतकरी सन्मान योजना’ असे नाव दिले असले, तरी ही शेतकऱ्यांचा अपमान करणारी योजना आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

कर्जमाफीची घोषणा होऊन तीन महिने झाले, तरी अद्याप शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दिवाळीऐवजी शिमगा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारने हा खेळखंडोबा थांबवावा, अशा शब्दांत त्यांनी सरकारचा समाचार घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यातील निम्मा पैसा उपग्रहांसाठी वापरला असता तर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला असता, शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते, असेही ते म्हणाले.

Outbrain