खासगी साखर कारखान्याच्या देयकावरून शेट्टींची कारवाईची मागणी

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाचे नवे प्रकरण आता ऊस दरावरून सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री, आमदार दिलीप सोपल यांच्याशी संबंधित आर्यन या खाजगी साखर कारखान्याने शेतकऱ्याची एफआरपीची थकीत रक्कम देण्याबाबत मुंढे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालातील खुलासा न पटणारा आहे, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणी मुंढे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ऊस दर नियंत्रण समितीच्या बठकीत केली आहे. यामुळे आता शेट्टी विरुद्ध मुंढे अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

खासदार शेट्टी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की शनिवारी मुंबई येथे ऊस दर नियंत्रण समितीच्या बठकीत थकीत  एफआरपीचा मुद्दा मी उपस्थित केला. गत ऊस गळीत हंगामामध्ये एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम न देणाऱ्या राज्यातील ६ साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्’ाातील दौलत व वारणा आणि सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व नागेवाडी कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्यांनी अद्यापही एफआरपीप्रमाणे रक्कम न दिल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी स्वाभिमानीची मागणी आहे.

आर्यन साखर कारखान्याच्या थकबाकीबाबत साखर आयुक्तांनी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना चौकशी अहवाल देण्यास संगितले होते. या कारखान्याची विल्हेवाट लावली जात आहे, पण त्याबाबतीत तसेच शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत मुंढे यांनी चौकशी अहवालात मांडलेली भूमिका पटणारी नाही. यामुळे मुंढेंची भूमिका संशयाची वाटत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुख्य सचिवांकडे केली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

याशिवाय गत हंगामात साखरेला चांगला दर मिळाल्यामुळे सर्व साखर कारखन्यांनी २२ मे पर्यंत प्रति टन ५०० रुपये दुसरा अ‍ॅडव्हान्स द्यावा अन्यथा स्वाभिमानीचे कार्यकत्रे कारखान्यातील गोदामातून साखर बाहेर पडू देणार नाहीत. मात्र याच दरम्यान आत्मक्लेश आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनाचे गांभीर्य १ जूनपासून वाढेल, असाही इशारा खासदार शेट्टी यांनी रविवारी दिला.