25 April 2019

News Flash

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना सेनेकडून धर्यशील माने यांचे आव्हान?

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने मित्रपक्ष जोडण्यास सुरुवात केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी

मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलेले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धर्यशील माने यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून हाकारे द्यायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात माने यांची लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यंदा शेट्टी हे राष्ट्रवादीचे मित्रपक्ष म्हणून उभे असणार आहेत. साहजिकच साखर कारखानदारांचे प्रथमच त्यांना पाठबळ असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने मित्रपक्ष जोडण्यास सुरुवात केली आहे. सत्तेचे वेध लागलेल्या उभय काँग्रेसने समविचारी पक्षांकडे मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातून पहिली टाळी दिली गेली ती राजू शेट्टी यांना. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर कोल्हापूर दौऱ्या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांना सोडणार असल्याचा निर्वाळा दिला. इकडे राजू शेट्टी यांच्यासारखा मित्र जमवला आणि तिकडे पक्षाच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. त्यांचे पुत्र धर्यशील माने यांनी तर थेट मातोश्रीवर धाव घेतली. भाजपशी आघाडी होवो न होवो शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी दंड ठोकला आहे.

तिसरी पिढी रिंगणात

हातकणंगले म्हणजे यापूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ.  एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्लं. याच मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळासाहेब माने हे सलग पाच वेळा निवडणूक जिंकले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली पण ती कल्लाप्पाण्णा आवाडे यांना मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यात अपयश आल्यावर दुसऱ्यांदा त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले, त्यातही यश आले नाही. तिसऱ्यांदा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनी शरद पवार यांच्याकरवी हातावर घडयाळ बांधले आणि सलग दोनदा संसद गाठली. त्यांची हॅट्ट्रिक चुकवली ती राजू शेट्टी यांनी. शिवारातून संसदेत पोचलेल्या शेट्टी यांना आता माने यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आव्हान देत आहे.

खासदार राजू शेट्टी हे चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व. ऊस आणि दूध उत्पादक शेतकरयांच्या पाठबळामुळे त्यांनी सलग दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली. प्रथम निवेदिता माने आणि नंतर कल्लाप्पाण्णा आवाडे या अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांना पराभूत केले. पश्चिम महाराष्ट्रातील सक्षम चळवळीतील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणाला उभे करायचे हे युतीतून निश्चित होत नव्हते. आता पवारांनी शेट्टींना जवळ केले नि माने गट बाजूला गेला. त्यातील धर्यशील माने यांनी तर मातोश्री गाठून थेट लोकसभेची उमेदवारी मिळवली यामुळे अन्य कोणी लढण्यास तयार नाही म्हणून शिवसेनेने धर्यशील माने हे उमेदवार म्हणून निवडले आहेत की ते एक शक्तिस्थळ म्हणून पुढे आणले आहे यावरून चर्चा होत आहे.

यशाच्या समीकरणाचा पट

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सहा पकी शिवसेनेचे तीन आणि भाजपचे दोन आमदार आहेत. माने सेनेचे उमेदवार असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने लक्ष्य केल्याने भाजप शेट्टींवरचा राग काढण्यासाठी पूर्णत मदत करणार हेही निर्वविाद. याचवेळी शेट्टी यांच्या पाठिराख्यांकडूनही यशाची गणिते मांडली जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेट्टी यांनी कष्ट घेतल्याने जातीपातीच्या पलीकडे जाऊन बळीराजा त्यांची पाठराखण करेल. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेचे वेध लागले असल्याने विरोधी उमेदवारास पराभूत करणे हे त्यांचे प्रथम उद्दिष्ट असल्याने ते शेट्टी यांना उघडपणे मदत करतील. आजवरचा कडवटपणा विसरून मत्र जागवणार असल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत. पाच आमदार सत्तारूढ पक्षाचे असले तरी त्यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागलेले प्रतिस्पर्धी तितकेच तुल्यबळ असल्याने त्यांची ताकद शेट्टी यांच्यासोबत राहणार, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जाते. प्रत्यक्षात राजकारणाच्या सारिपाटावरची प्यादी कशी चाली खेळतात यावर लोकसभेचे खळे कोण लुटणार याचा फैसला होणार आहे.

First Published on December 6, 2018 12:52 am

Web Title: raju shetti vs shiv sena