राजू शेट्टी यांची टिका

कोल्हापूर : ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयची पीडा यांच्यामागे लावली त्यांनाच मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला सन्मानाने निमंत्रण दिले आणि ज्यांनी प्रामाणिकपणे यांना खुर्चीवर बसवले ते मात्र बेदखल झाले,अशी संतापजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र या सोहळ्याला स्वाभिमानीसह मित्रपक्षांना निमंत्रण दिले नसल्याने शेट्टींसह अन्य नाराज झाले आहेत. शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून मंत्री केले जाणार अशी चर्चा असताना त्यांना साधे निमंत्रण दिले गेले नाही.

याबाबत शेट्टी म्हणाले, संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यावर अढळ श्रध्दा असणाऱ्या महाराष्ट्रातील छोटय़ा पक्षांनी भाजपासारख्या संधीसाधू आणि जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्याच घटक पक्षांचा विसर महाविकास आघाडी पक्षाच्या नेत्यांना झाला.  ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयची पीडा यांच्यामागे लावली त्यांना सन्मानाने निमंत्रण. ज्यांनी प्रामाणिकपणे यांना खुर्चीवर बसवले ते मात्र बेदखल झाले अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली. याचवेळी  त्यांना याची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.