बदलती राजकीय – सामाजिक परिस्थिती

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

‘मी पराभवाने खचणारा माणूस नाही, लढणं माझ्या रक्तातच आहे’, असे म्हणत खासदारकीची निवडणूक हरलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी नव्या उमेदीने ‘पुनश्च हरिओम’ करण्याचा निर्धार केला आहे. ‘राजकारण हे आपले साध्य नाही, साधन आहे, असे म्हणणऱ्या शेट्टी यांनी सुमारे १५ वर्षांनंतर लोकप्रतिनिधित्व नसताना ‘पुन्हा उठवू सारे रान’ असा निर्धार केला असला तरी बदलत्या राजकीय – सामाजिक परिस्थितीत नव्याने झेप घेणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.

शेट्टी जुलैमध्ये शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणार असले तरी निवडणुकीतील पराभवामुळे कच खाल्लेल्या कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करण्याबरोबरच शेट्टी यांनाही आपल्यामध्ये पूर्वीचाच लढण्याचा ‘जोश’ कायम आहे, हे सिद्ध करावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाच्या मताधिक्याने मात केली. हा पराभव ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला, पण शेट्टी यांनी निकालाच्या तिसऱ्याच दिवशी मतदारसंघाचा दौरा करून मतदारांशी संपर्क साधला. तर, गेल्या आठवडय़ात राज्याचा दौरा करून जनमत आजमावले. या दोन्ही दौऱ्यावेळी त्यांच्या समर्थकांनी, आता पुरे झाले लोकांची कामे करीत राहणे, असा लोकहिताची कामे करण्यापासून परावृत्त करणारा सल्ला दिला. तर काहींनी ‘पुन्हा नव्या उमेदीने, नव्या ताकदीने रस्त्यावर उतरा, अशी विनंती करत चळवळीची बांधिलकी सोडता येणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी शेतकरी, समर्थक यांच्या पाठबळाला ओहोटी लागली नसल्याचे शेट्टी यांच्या लक्षात आले. त्यामुळेच कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शेट्टी यांनी शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा एकदा ‘एल्गार’ करण्याची घोषणा केली. १ जुलैला वाढीव वीज बील आणि वीज जोडणीच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. ५ आणि ६ जुलै रोजी स्वाभिमीनीचे चिंतन शिबीर घेण्यात येणार असून राज्य कार्यकारणीच्या बैठकीत राजकीय दिशा जाहीर केली जाणार आहे. थकीत ‘एफआरपी’ मिळवण्यासाठी आणि आगामी ऊस गळीत हंगामात निर्माण होणाऱ्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा कृती कार्यक्रम शेट्टी यांनी पहिल्या टप्प्यात हाती घेतला आहे.

नव्याने बांधणी

राजकारणापेक्षा शेतकरी चळवळ अधिक महत्त्वाची आहे, अशी मांडणी करणाऱ्या शेट्टी यांना नव्या उमेदीने लढा उभारावा लागणार आहे. शिरोळ तालुक्यातील शेतकरी नेता ते राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी संघटनांचे नेतृत्व अशी झेप घेताना शेट्टी यांनी कमावले आणि गमावलेही खूप. शेतकरी संघटनेला मूर्त स्वरूप आणताना शेट्टी एकदा विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. आता यापैकी कोणतेही पद त्यांच्याकडे नाही. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून शिरोळचे शिवसेनेचे आमदार असे अनेक जवळचे सहकारी त्यांची साथ सोडून गेले आहेत. यामुळे नाही म्हटले तरी संघटनात्मक ताकद कमी झाली आहे. त्यांना नवे आश्वासक सहकारी उभे करावे लागतील. शेट्टी यांना सत्ता, पद नसतानाही प्रतिकूल परिस्थितीतही लढावे लागेल असा आत्मविश्वास पराभवामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करावा लागेल. ‘यापूर्वीही मी पराभूत झालो आहे, पराभव नवा नाही, अशा शब्दांत शेट्टी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत. पण, या आधी शेट्टी पराभूत झाले ते सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत, सार्वत्रिक निवडणुकीत नव्हे. खेरीज, गेली १८ वर्षे ते जिल्हा परिषदेपासून संसदेपर्यंतच्या सर्व निवडणुका सलगपणे जिंकले होते.

कसोटीचा काळ

राजकीय, सामाजिक परिस्थिती बदलली असली तरी या नव्या परिस्थितही राजू शेट्टी शेतकऱ्यांना आधार ठरतील, अशी आशा राजकीय अभ्यासकांना वाटते. राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांच्या म्हणण्यानुसार, शरद जोशी यांच्या सोबतीने शेट्टी यांची शेतकरी चळवळीची जडण घडण झाली. पुढे शेट्टी यांनी स्वत:ची संघटना काढली. मात्र दोघांमध्ये काही फरक होता. जोशी यांना राज्यभर प्रतिसाद मिळाला असला तरी ते निवडणुकीत जिंकू शकले नाहीत. या उलट शेट्टी यांची संघटना मर्यादित भागात असूनही ते आमदार आणि खासदार झाले. चळवळ आणि राजकारण यांची सांगड शेट्टी घालू शकले. साखर उद्योगात आव्हाने निर्माण झाली असताना त्यांच्या लढय़ाची कसोटी लागेल. सरकार, साखर कारखानदार यांच्याशी संघर्ष करतानाच त्यांच्याकडून काहीतरी मिळवून ते शेतकऱ्यांना देताना त्यांना समतोल साधावा लागेल.