कोंबडी व्यवसायातून कोटय़वधीच्या फसवणुकीचा मुद्दा

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांच्यातील एका वादाला नव्याने सुरुवात झाली आहे.  ‘कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आले असून कंपनीच्या संचालक मंडळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप करीत शेट्टी यांनी हे प्रकरण स्वाभिमानीच्या वतीने धसास लावण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तर, खोत यांनी याचा इन्कार केला असून शेट्टी खोटी माहिती पसरवत असल्याचे नमूद करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. दोघांनीही सवंग भाषा वापरत आरोप-प्रत्यारोप सुरू केल्याने लोकसभेपूर्वी रंगलेल्या उभयतांमधील संघर्ष विधानसभा निवडणुकीत रंगण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांना शेतीबरोबर पूरक व्यवसाय करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात जनावरांच्या खालोखाल कुक्कुटपालन व्यवसायाला स्थान आहे. त्यात हल्ली कडकनाथ कोंबडी पालन करण्याचा धंदा भलताच तेजीत आला आहे.

कडकनाथ ही कोंबडय़ाची एक प्रजाती आहे. या जातीला स्थानिक पातळीवर ‘कालामासी’ या नावाने ओळखले जाते. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे रक्त आणि मांसही काळे असते, तसेच ते आरोग्यवर्धक आणि औषधी असल्याचा दावा केला जातो. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरात लगतचे जिल्हे येथे या जातीचे मूळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबडय़ा पाळतात. शिवाय हा पक्षी ते पवित्र समजतात. कोल्हापुरात दिवाळीपूर्वी याच कडकनाथ कोंबडीवरून शेट्टी – खोत या एकेकाळच्या मित्रांत झुंज रंगली असून वादाचा निम्न स्तर पाहता राजकीय शहाणपणाचा बळी जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरू करा आणि अल्पकाळात भरघोस नफा मिळावा अशी जाहिरात केली. एका वर्षांत ७५ हजार रुपयांच्या मोबदल्यात एक लाख रुपयांचा परतावा मिळणार असल्याचे आमिष दाखवल्याने सामान्य लोक, शेतकरी, बचत गटाच्या महिला यांनी रांगा लावून हजारो रुपये बिनदिक्कत भरले. आता प्रकल्पाच्या संचालकांनी सुमारे दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुंतवणूकदार शेतकरी सांगत आहेत. तथापि, गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या देय रकमा परत मिळण्यात अडचणी येत आहेत. ही रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चुळबुळ  सुरू झाली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील कंपनीच्या कार्यालयांचे बंद दरवाजे अनेक दिवस न उघडल्याने गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. पाठोपाठ संचालक गायब झाल्याने संशयाचे धुके दाट झाले आहे.

वादाची झुंज

याबाबत कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या आमिषाने महारयत अ‍ॅग्रो या कंपनीने फसवणूक केली असल्याचा पाढा वाचला. यानिमित्ताने शेट्टी यांना खोत यांच्यावर शरसंधान करण्याची संधी आपसूकच चालून आली. राजू शेट्टी तसेच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कंपनीच्या संचालक मंडळावर शेतकऱ्यांचे गुंतवणूक केलेले पैसे लाटल्यावरून कारवाई करण्याची मागणी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली. हा मुद्दा पुढे नेत शेट्टी यांनी खोत यांच्यावर निशाणा साधला.

शेट्टी यांनी दुगाण्या डागल्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांचा तिळपापड झाला. त्यांनीही शेट्टी यांच्यावर पलटवार केला. या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करताना सदाभाऊ  खोत म्हणाले, ‘माझ्या जावयाने फसवणूक केली असे म्हणणे हेच मुळातच चुकीचे आहे.  तो माझा जावई आहे आणि महारयत अ‍ॅग्रोचे प्रमुख आपले नातेवाईक हे सिद्ध करून दाखवले तर मी राजकारण सोडतो. अन्यथा शेट्टी हे राजकारण सोडणार का याचे स्पष्टीकरण त्यांनी करावे. याप्रकरणी शेट्टींवर अब्रुनुकसानाची दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आरोप सिद्ध करण्याचे आव्हान खोत यांनी दिले. त्याला स्वाभिमानीकडून प्रत्युत्तर देण्यात आले. जुने मित्र आता कट्टर वैरी बनले असून त्यांच्यातील कोंबडय़ाची झुंज विधानसभा निवडणूक आटपेपर्यंत संपण्याची शक्यता नाही.

कोल्हापुरात गुन्हा दाखल’

पश्चिम महाराष्ट्रात गाजत असलेला कुक्कुट वाद पोलिसांत पोहचला आहे. कडकनाथ कोंबडी व त्याचे खाद्य देण्याच्या अमिषाने महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात संचालकांविरोधात सुमारे चार  कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला. गुन्ह्य़ामध्ये संशयित सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, सांगली) यांच्यासह इतर संचालकांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद विजय विलास आमते ( शिंगणापूर, करवीर) यांनी येथे दिली आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे आमिष अ‍ॅग्रो कंपनीने गुंतवणूकदारांना दाखवून आर्थिक गंडा घातला आहे. यामध्ये आठ ते १० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या गैरव्यवहारात सदाभाऊ  खोत यांचे जावई आहेत. म्हणजे या घोटाळ्याला राजकीय आश्रय आहे, असे ‘कोंबडी चोर’ मंत्री सरकारला कसे चालतात?

– माजी खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सारे आरोप चुकीचे. आपले नातेवाईक असल्याचे शेट्टी यांनी सिद्ध करून दाखवावे. – सदाभाऊ खोत, राज्यमंत्री