शेतकरी हितासाठी काम करत असल्याचा सरकारचा दावा फसवा आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची निवडणुकीपूर्वीची सरकारची घोषणा म्हणजे ‘अच्छे दिन’चे गाजर आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली.

माणगाव (ता. हातकणंगले) येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते. या वेळी शेट्टी यांनी शासनाच्या शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याचे सांगत जोरदार हल्ला चढवला.

ते म्हणाले, की पंतप्रधानांसह चुकीच्या लोकांबरोबर आपण काही काळ राहिलो. पण तिथे मन रमत नसल्याने पश्चाताप झाला. त्यातून आत्मक्लेश यात्रा काढली. देशातील बडय़ा उद्योगपतींनी शासकीय बँकांचे अब्जावधी रुपयांचे कर्ज बुडवले. ते परदेशात बिनधास्त पळून गेले. मात्र देशातील शेतकऱ्यांना काही हजार रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी याच बँका आत्महत्या करण्यास भाग पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी कृषी  उत्पादन वाढवले, पण त्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभावच मिळाला नाही, त्यामुळे उत्पन्न कमी मिळाले व तो पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना घोषित केलेल्या दराशी कटिबद्ध आहे. कारखाना बंद झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत जाहीर केलेला दर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री  प्रकाश आवाडे यांनी सांगितले. शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. उपसरपंच राजू मगदूम, राजू जगदाळे यांचेही भाषण झाले.