X

कोल्हापुरात खंडणीखोरांच्या टोळ्यांची दहशत

या गुन्ह्यांमधील १८ गुन्हेगारांवर सध्या पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.

दहा दिवसांत आठ गुन्हे दाखल

शहरासह जिल्ह्यत खंडणीखोरांच्या टोळ्यांची दहशत निर्माण झाली असून, खंडणीखोरांविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन पोलिसांनी करताच तक्रारी दाखल होत आहेत. गेल्या दहा दिवसात खंडणीचे आठ गुन्हे दाखल झाले असून, १८ संशयितांवर कारवाई सुरू झाली आहे . फेरीवाल्यांपासून ते बांधकाम व्यावसायिकांपर्यंत अनेकांना रोजच खंडणीखोरांचा सामना करावा लागतो. थेट पोलिस अधीक्षकांकडे काही तक्रारी पोहोचल्यानंतर पोलिसांनी खंडणीखोरांविरोधात मोहीम सुरू केली आहे

रस्त्यावरील विक्रेते, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, आणि बांधकाम व्यावसायिकांना धमकावून स्वतचे खिसे भरण्याचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. अनेक खंडणीखोर यातून महिन्याला लाखो रुपये उकळतात. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि काही राजकीय लोकांच्या आश्रयामुळे आत्मविश्वास दुणावलेले खंडणीखोर शिरजोर बनले आहेत. दर महिन्याची खंडणी उकळल्यांतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम अशी कारणे शोधून हजारो रुपये जबरदस्तीने उकळले जातात. रोज उठून गुंडांचा त्रास नको या भावनेतून लोक पसे देतात, मात्र यातून निर्माण झालेली दहशत गुन्हेगारी घटना वाढवण्यासही कारणीभूत ठरत आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजीत खंडणीखोरांच्या टोळ्याच सक्रिय आहेत.  हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर पसे न देताच उठून जाणे, कापड दुकानांमध्ये फुकटात खरेदी करणे, वाइन शॉपी, बिअर बारमध्येही यांची दादागिरी सुरू आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी खंडणीखोरांविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत असून, गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात खंडणीचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमधील १८ गुन्हेगारांवर सध्या पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. खंडणीखोरांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने खंडणीचे गुन्हे पोलिस ठाण्याबाहेर मिटवण्याचे प्रकार थांबले आहेत. पोलिस ठाण्याबाहेर परस्पर गुन्हा मिटवण्याचा प्रकार घडल्याचे लक्षात येताच संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.

बांधकाम व्यावसायिक लक्ष्य

शहराची वाढ सुरू असून अनेक ठिकणी बांधकामे सुरू आहेत. बांधकामास परवानगी घेण्यापासून ते प्रकल्प पूर्ण होईपर्यंत बांधकाम व्यावसायिकांना खंडणीखोरांचा त्रास सहन करावा लागतो. यात काही स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेतील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. खंडणीखोरांना टिप देऊन टक्केवारीवर पसे घेतले जातात. या प्रकाराला वैतागून काही बांधकाम व्यावसायिकांनी शहरात काम करणेच थांबवले आहे. खंडणीखोरांचे काही पोलिसांशीही साटेलोटे असल्याचा आरोप केला जातो.

Outbrain