दयानंद लिपारे

ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांची हस्तलिखिते, चित्रे, पुरस्कार, छायाचित्रांचे इचलकरंजीतील आपटे वाचन मंदिरात जतन केले जाणार आहे. स्वत: मतकरी यांच्या कुटुंबीयांनी  याबाबत पुढाकार घेत हा साहित्य ठेवा या वाचनालयास देण्याचा निर्णय घेतला. करोना साथीने अडथळा निर्माण केल्याने या साहित्याचे हे हस्तांतर रखडले आहे.

यंदा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असलेल्या आपटे वाचन मंदिरात अनेक लेखकांची हस्तलिखिते आणि अन्य साहित्य ठेव्याचा संग्रह आहे. यामध्येच मतकरी यांच्याही या ठेव्याचे स्वतंत्र दालन करत त्याचे जतन केले जावे अशी इच्छा मतकरी यांची कन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी ग्रंथालयाशी संपर्क साधून व्यक्त केली होती. यानुसार मतकरी यांच्या पुस्तकांची हस्तलिखिते, त्यांनी काढलेली चित्रे-छायाचित्रे, त्यांचे पुरस्कार संस्थेकडे सुपूर्द केले जाणार आहेत.

मतकरी हे नेटके आणि शिस्तबद्ध लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे अनेक पुस्तकांची, नाटकांची हस्तलिखिते आहेत. या हस्तलिखितांवर त्यांनी संदर्भाच्या अनेक खुणा केल्या आहेत. या खुणा नाटकाचे दिग्दर्शक, निर्माते, अभ्यासक, संशोधक यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. उत्तम चित्रकार असलेल्या मतकरींनी अनेक उत्तमोत्तम चित्रकृती रेखाटलेल्या आहेत. साहित्य अकादमी, संगीत अकादमीसह विविध संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हा सर्व ठेवा त्यांच्या कुटुंबीयांकडून या वाचनालयास भेट देण्याचा निर्णय झाला आहे. या सर्व वस्तू संस्थेकडे यापूर्वीच पाठवल्या जाणार होत्या. मात्र करोना साथीमुळे सध्या हे हस्तांतर रखडले आहे. या सर्व साहित्यिक ठेव्यातून आपटे वाचन मंदिरात मतकरी यांचे स्वतंत्र दालन साकारले जाणार असल्याचे ग्रंथालयाचे अध्यक्ष स्वानंद कुलकर्णी यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.