दूध दर कपातीचे लोन राज्यातील सर्वात मोठ्या (कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ) गोकुळ दूध संघापर्यंत आले आहेत. गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाने कपात करण्याचा निर्णय गोकुळच्या संचालक मंडळाने घेतला असल्याचे सूत्रांनी आज सांगितले. २१ जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठत दूध पावडर आणि लोणी दर घसरल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे गोकुळने उत्‍पादक दूध संस्थांना पाठवलेल्या छोटेखानी पत्रात म्हटले आहे. गोकुळकडे दररोज सुमारे साडे पाच लाख लिटर गायीच्या दुधाचे संकलन होते.

स्‍वाभिमानी आंदोलनाला गोकुळचा पाठीबा

केंद्र व राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, दूध पावडर अनुदान द्यावे व जीएसटी कमी करावा याकरिता स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्‍या दूध बंद आंदोलनाला पाठिंबा म्‍हणून गोकुळ संघामार्फत २१ जुलै रोजी सकाळ पाळीतील दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दिलेला आहे, असे संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी शनिवारी सांगितले.