हद्दवाढ कृती समिती आणि हद्दवाढविरोधी कृती समिती, लोकप्रतिनिधी या सर्वाची मते ऐकून कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबतचा अहवाल सात दिवसांत पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी सोमवारी सांगितले. शहराची हद्दवाढ अनेक वर्षांपासून झाली नाही, त्याचा परिणाम शहराचा विकास खुंटण्यात झाला आहे. भविष्यातील विकासासाठी तातडीने हद्दवाढ करण्यात यावी. जिल्ह्याचे मुख्य प्रशासन अधिकारी या नात्याने शासनाकडे त्या संदर्भातील अहवाल आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठीचे निवेदन कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने सनी यांना सोमवारी देण्यात आले. या वेळी डॉ. सनी यांनी सांगितले.
मागील चार महिन्यांपासून वेगवेगळय़ा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने हद्दवाढसंदर्भातील अहवाल पाठवण्यात आलेला नव्हता. सद्य:स्थितीत कोणतीही आचारसंहिता नसल्याने लवकरात लवकर पाठवावा अशी विनंती त्यांना समितीने केली.
ग्रामीण भागातील लोकांना सुविधा हव्यात मग हद्दवाढ का नको अशी विचारणा निवासराव साळुंखे यांनी केली. राजेश लाटकर म्हणाले, की ग्रामीण व शहरी असा भेदभाव केला तर हद्दवाढ करण्याचा निर्णय होणार नाही यामुळे सकारात्मक अहवाल पाठवावा. यावर जिल्हाधिकारी डॉ. सनी म्हणाले, की याबाबतचा अहवाल शासनास पाठवण्यात येईल.
या वेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, अशोक पोवार, प्रसाद जाधव, मधुकर रामाणे, जयकुमार िशदे, किसन कल्याणकर आणि कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.