सहकार ही समाजातील दुबळ्या घटकांसाठी चालविली जाणारी चळवळ आहे. सहकारी बँका या समाजातील उपेक्षित वर्गाला पाठबळ देण्याचे काम करीत असतात. अशा बँकांच्या बाबतीत रिझव्‍‌र्ह बँकेने सहानुभूतीचा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. सामान्य माणसाला मदत करणाऱ्या, हित जपणाऱ्या, उपेक्षित घटकांना आíथकदृष्ट्या सबळ करणाऱ्या सहकारी बँकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील आद्य सहकारी बँक दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा सांगता समारंभ सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धेैर्यप्रसाद सांस्कृतिक भवन येथे सोमवारी झाला. खासदार शरद पवार  म्हणाले, दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे नेतृत्व कै. भास्करराव जाधव यांच्यासह ज्या धुरिणांनी केले त्यांच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र चालविण्याची गुणवत्ता होती. सहकारामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आदर्श घालून दिला, असे गौरवोद्गारही पवार यांनी या वेळी काढले.
महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीची परंपरा खूप मोठी आहे. सहकारी संस्थांची संख्या खूप जास्त आहे तरीही गुणवत्तेच्या निकषावर गुजरातमधील सहकारी संस्था जास्त सरस ठरतात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला जाईल, सहकाराच्या प्रत्येक क्षेत्रातील २५ चांगल्या संस्था निवडून त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे सांगून सहकारी संस्थांमधील ५ लाखांपर्यंतची डिपॉझीट सुरक्षित करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने पावले उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहकार , जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. बँकांनी नवनवीन उद्योगांचे सुमारे १०० प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन तरुणांना उद्योगासाठी मार्गदर्शन करावे व कर्ज उपलब्ध करुन द्यावे. खेळाडूंना क्रीडा विकासासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. आज अनेक बाजूंनी शेतकरी अडचणीत आहे, अशा स्थितीत कर्ज वितरणातील ठराविक हिस्सा बँकांनी शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावा व शेतकऱ्यांच्या उभारणीला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.