28 October 2020

News Flash

नवरात्रोत्सवावरील निर्बंध

कोल्हापूरचे अर्थचक्र ठप्प

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

करोना संसर्गामुळे या वर्षी कोल्हापुरातील नवरात्र उत्सवाच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. या उत्सवामुळे दरवर्षी कोटय़वधींची होणारी आर्थिक उलाढाल यंदा घटणार आहे. रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांसह पंचतारांकित हॉटेल व्यवसायावर याचा परिणाम होणार आहे. दसऱ्यामध्ये होणाऱ्या हमखास आर्थिक कमाईच्या साधनावर पाणी सोडावे लागणार असल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे.

करवीरनिवासिनी महालक्ष्मी ही राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. यामुळे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंतच्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी राज्य-परराज्यातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरला भेट देत असतात. देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या विविध व्यापार-उदीमबरोबरच पर्यटन व्यवसायालाही चालना मिळते. विविध क्षेत्रांतील अर्थकारणाला गती प्राप्त होते.

मात्र यंदा करोना संसर्गामुळे मंदिर बंद राहणार आहे. या कालावधीत महालक्ष्मी मंदिरातील दरवर्षी होणारे पूजा विधी व अन्य सोहळे हे अंतर्गतरीत्या पार पडले जाणार आहेत. परिणामी भाविकांना यंदा देवीच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे. लक्षावधी भाविकांची रीघ घटणार असल्याने त्याचा अर्थकारणावरही परिणाम होणार आहे. उत्सव काळामध्ये देवीचे दर्शन घेत असताना प्रसाद, नारळ, पुष्पहार, फुले, पेढे याचबरोबर देवीला अर्पण करायच्या सोन्या-चांदीचे अलंकार असे विविध नानाविध वस्तूंची खरेदी भाविकांकडून केली जाते. याच्या बरोबरीनेच कोल्हापुरात आल्यानंतर अन्य वस्तूंची खरेदी केली जाते. हे सारे व्यवहार आणि त्यातून अर्थकारणाला मिळणारी गती यंदा दिसणार नाही. एका अंदाजानुसार कोल्हापुरात यंदा ही कोटय़वधींची उलाढाल ठप्प होणार आहे.

* दहा दिवसांच्या या कालावधीत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून अनेक छोटय़ा विक्रेत्यांचा दसरा-दिवाळीचा  खर्च निघतो.

* काही व्यापाऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे हे व्यापारी नवरात्र उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा त्यांना हे उत्पन्न गमवावे लागणार आहे.

* श्रीपूजकांचे उत्पन्नही घटणार आहे. हॉटेलमधील खानपान, निवास, वाहन व्यवसाय, वाहनतळ, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी दागिने विक्रेते या सर्वाना फटका बसणार आहे.

* भाविक, पर्यटकांची संख्या कमी होणार असल्यामुळे मंदिरालगतच्या महाद्वार, ताराबाई, ज्योतिबा या मार्गावरील विक्रेते-दुकानदार यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याचे विक्रेत्यांचे प्रतिनिधी महेश उरसाल यांनी  सांगितले.

देवस्थान समितीच्या उत्पन्नात घट

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अर्थकारणालाही यंदाच्या या निर्बंधांचा फटका बसणार आहे. दरवर्षी समितीला नवरात्रीत सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न भाविकांकडून मिळते. करोनामुळे सहा महिने आधीच उत्पन्न घटले असताना त्यामध्ये आता नवरात्रीतील हमखास उत्पन्नालाही मुकावे लागणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:11 am

Web Title: restrictions on navratri kolhapur economic cycle stalled abn 97
टॅग Coronavirus,Navratra
Next Stories
1 आमदार विनय कोरे यांच्या मातोश्री शोभाताई कोरे यांचे निधन
2 नोव्हेंबरमध्ये कोल्हापूर खड्डेमुक्त – सतेज पाटील
3 कोल्हापूरच्या प्रशासनात दोन प्रमुख पदं पती-पत्नीकडे; कादंबरी बलकवडे महापालिका आयुक्त
Just Now!
X