गोविंद पानसरे खून प्रकरणाचा तपास आता मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रुद्रगौंडा पाटील यांच्यावर येऊन स्थिरावला आहे. समीर गायकवाड व पाटील या दोघांचा पानसरे व कलबुर्गी यांच्या खुनात सहभाग आहे का ही शक्यता तपास यंत्रणा अजमावून पाहात आहे. या दोघांचे संभाषण बेळगाव येथे झाल्याची माहिती तपास यंत्रणेला उपलब्ध झाली आहे. तर सोमवारी कर्नाटक येथील पोलिसांचे एक पथक आज येथे दाखल झाले असून, त्यांनी गायकवाडकडून माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे. गायकवाड याची पोलीस कोठडी संपण्याची मुदत मंगळवारी एक दिवसाचा अवधी राहिला असल्याने तपास यंत्रणा अधिक वेगवान झाली आहे.
गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी विशेष पोलीस पथकाने सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक केली आहे. याच्याकडून अधिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न तपास यंत्रणेने सुरू केले आहेत. या तपासाला आज कर्नाटकातून आलेल्या पोलीस पथकाची जोड मिळाली. पानसरे व धारवाड येथील विचारवंत कलबुर्गी या दोघांच्या खुनाची पदधत एकाच प्रकारची आहे. या आधारे समीर गायकवाड व रुद्रगौंडा पाटील या दोघांचा या खुनाशी संबंध आहे का, ही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. या दोघांची संभाषणाची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली असून, दोघांचे बेळगाव येथे अनेकदा बोलणे झाल्याची माहिती मिळाली आहे. पाटील याला यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने फरार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे येथे आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने गायकवाड याच्याकडून पाटीलशी असलेल्या संबंधाबाबत चौकशी केली आहे. हे पथक नवी दिल्लीला परतले आहे.
दरम्यान, गायकवाड याला सांगली येथून विशेष तपास पथकाने अटक केल्यानंतर न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत बुधवारी संपत आहे. गायकवाड याच्या पोलीस कोठडीचा कालावधी अल्पकाळाचा राहिला असल्याने पथकाच्या तपासाला आणखी गती आली आहे.