राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असून ही वेळ राजकारण करण्याची नाही. राज्यातील दुष्काळ हटत नाही तोवर सत्ताधारी-विरोधक असे मतभेद विसरून एकत्रित काम केले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. आज लोकांना काँग्रेस सरकारची आठवण येत असेल तर सरकार चालवण्यात आपण नालायक ठरू, अशा शब्दांत त्यांनी घरचा आहेर दिला.
हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखाना कार्यस्थळी  दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात दुष्काळ स्थिती आणि शेतकऱ्यांची होत असलेली परवड याविषयी सर्वच वक्त्यांनी चिंता व्यक्त केली.
शेतकरी जे मागतो ते देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. तो भीक नव्हे तर हक्क मागत आहे. त्यात आपण कमी पडत असलो आणि लोकांना काँग्रेस सरकार आठवत असेल तर ते दुर्दैवी आहे, असा चिमटा ठाकरे यांनी काढला. एकीकडे शेतकऱ्यांना धरणातून पाणी मिळवून द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या उसाला हमीभाव मिळवून देऊन त्यांना सुखी करायचे हे सदाशिवराव मंडलिक यांचे तत्त्व सरकारने स्वीकारण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
आज सीमावासीय बांधवांनी भेट घेतल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, याबाबत सुप्रीम कोर्टात दावा सुरू असून दाव्यावेळी आपला वकील हजर राहात नसल्याची तक्रार सीमावासीयांनी केली असून हा प्रकार दुर्दैवी आहे. राज्य मोडण्याची भाषा करणाऱ्या अणे यांना आपण हाकलतो, पण आपल्याच मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यात कमी पडतो.
 ‘एफआरपी’ १५ एप्रिलपासून- सहकारमंत्री
हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, राजू शेट्टी, संयोजक प्रा. संजय मंडलिक यांनी एफआरपीचा मुद्दा आपल्यापरीने मांडला. त्याचा उलेख करीत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उर्वरित २० टक्के एफआरपी १५ एप्रिलपासून वाटण्यास सुरुवात होणार असल्याची घोषणा केली. त्याचे वाटप १ मे पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले.