कोल्हापूर : राज्यात करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी महिनाअखेर पर्यंत संचारबंदी लागू केल्याने बुधवारी शहरात बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत होत्या. जीवनावश्यक वस्तू व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. या तुडुंब गर्दीमुळे प्रशासनाची करोना नियमावली पायदळी तुडवली गेली.

राज्यामध्ये करोना संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. यामुळे राज्य शासनाने एक मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी रात्रीपासून यापुढे काही दिवस घरातून बाहेर पडणे शक्य होणार नाही. यामुळे आज कोल्हापूर शहरात अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. रात्री आठ वाजता संचारबंदी लागू होणार असल्याने सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहक मोठय़ा प्रमाणात खरेदी करत होते. दुचाकी वाहने रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड, शिवाजी चौक, मध्यवर्ती बस स्थानक येथे एकच गर्दी उसळली होती .‘यापुढे नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे शक्य होणार नाही. याचा अंदाज आल्याने आज दिवस मावळण्यापूर्वी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यास नागरिक प्राधान्य देत होते. दिवसभरात सर्वच क्षेत्रामध्ये मोठी उलाढाल झाली,’ असे कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष, वीरशैव सहकारी बँकेचे संचालक संदीप नष्टे यांनी सांगितले.