जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातून गेल्या पाच दिवसांपासून आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सवात सहभागी झालेल्या १९६ बचतगटांच्या उत्पादनांची ३४ लाखांची विक्री झाली असून या महोत्सवाचा समारंभपूर्वक समारोप करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन अर्थात ताराराणी महोत्सव येथील प्रायव्हेट हायस्कूल ग्राऊंडच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता.
ताराराणी महोत्सवामध्ये जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील १९६ बचत गटांनी सहभाग घेतला असून या पकी जवळपास ७६ बचत गट विविध खाद्य पदार्थाचे आहेत तर १२० बचत गटांनी अन्य विविध प्रकारच्या उत्पादनाचे स्टॉल ठेवले होते. या बचतगटांच्या उत्पादनांना, खाद्य पदार्थाच्या स्टॉलना जनतेने उत्स्र्फूत प्रतिसाद दिला. आज अखेर या महोत्सवात ३४ लाखांची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एच. टी. जगताप यांनी दिली.
महिलांना अत्मसन्मान- डॉ.  देशमुख
बचतगट चळवळीमधून महिलांना अत्मसन्मान आणि अत्मनिर्भता मिळते, त्यामुळे ही चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी सर्वानी महिला बचतगटांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमात विक्रमी विक्री करणाऱ्या बचतगटांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास समन्वयक सम्राट पोतदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.