23 November 2017

News Flash

‘विक्रीकर भवन’चे झाले ‘जी.एस.टी. भवन’

अप्रत्यक्ष कराची पारदर्शक पद्धत म्हणून हा एकच वस्तू सेवा कर लागू करण्यात आला.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: July 2, 2017 3:20 AM

( संग्रहित छायाचित्र )

काल मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू करण्याचे दृश्य परिणाम शासकीय कामकाजावर उमटू लागले असून या कराच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी करवीर नागरीतील ‘विक्रीकर भवन’चे नामकरण ‘जी.एस.टी. भवन’ असे करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवारी अर्थतज्ज्ञ एम.एस. देशमुख यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी फीत कापून नवीन नामकरण फलकाचे उद्घाटन केले.

अप्रत्यक्ष कराची पारदर्शक पद्धत म्हणून हा एकच वस्तू सेवा कर लागू करण्यात आला. मागील १५ वर्षांपासून केंद्र आणि सर्व राज्य स्तरावर ही कर प्रणाली अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आजपासून ही प्रणाली लागू करण्यात आली. हा निर्णय सामान्य माणसाच्या हितासाठी घेण्यात आला आहे, असे  देशमुख याप्रसंगी म्हणाले. राज्य सहकर आयुक्त विलास इंदलकर , इंजिनियिरग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कांडेकर, संचालक प्रदीप कापडिया यांनी मनोगत व्यक्त केले.

जीएसटीचा शुभारंभ

केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाच्यावतीने येथील रेसिडन्सी क्लब येथे जीएसटीचा शुभारंभ शनिवारी श्रीमंत शाहूमहाराज छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. जीएसटीमुळे देशाचे उत्पन्न वाढून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक, केंद्रीय

जीएसटी आयुक्तालयाचे आयुक्त विद्याधर थेटे, अप्पर आयुक्त के. के. श्रीवास्तव, बी. पी. सिंग, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यापारी संभ्रमात

जीएसटीची आकारणी सुरू झाली असली तरी ही कर प्रणाली कशी राबवायची याबाबत व्यापारी वर्गात आज पहिल्या दिवशी संभ्रम होता. जीएसटी प्रणाली नेमकी कशी हाताळायची हे अनेकांना कळत नसल्याचे मोबाईल विक्रेते संदीप नष्टे यांनी सांगितले. तर, पहिल्या दिवसाचा अनुभव साधारण आहे, असे सांगून कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, अडचणी येत राहिल्या तरी संबंधित यंत्रणेशी संप्र्क साधून पुढे जात राहणेच योग्य ठरणार आहे. सरावाने अडचणी दूर होतील.

First Published on July 2, 2017 3:04 am

Web Title: sales tax building become gst bhavan