संततधार पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये मंगळवारी महापुराचा हाहाकार उडाला. या दोन्ही शहरांतून अनुक्रमे ३२ हजार आणि १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

या दोन्ही शहरांमध्ये मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासोबतच नौदलालाही पाचारण करण्यात आले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागांतील  सर्व मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्यातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग होत असल्याने सांगलीला सोमवारपासूनच पुराचा वेढा पडला आहे. मंगळवारी पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आणि शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या गणेश मंदिर परिसरातील बाजारपेठेतही पाणी पोहोचले. टिळक चौक, हरभट रोड, मारुती रोड या मुख्य बाजारपेठेत तीन फुटांपेक्षा अधिक पाणी साचले. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याने सोमवारी रात्रीपासूनच मदतकार्य सुरू  करण्यात आले.

सांगलीला जोडणारे कोल्हापूर, पुणे आणि बेळगाव हे सर्व मार्ग बंद झाले असून केवळ पंढरपूर आणि तासगाव हे दोनच मार्ग खुले आहेत. रेल्वे सेवाही दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे शहरातील दूध आणि भाजीपाला वितरण ९० टक्के कमी झाले आहे.

कोल्हापुरातील पूरस्थितीही भीषण होत आहे. शहर हद्दीतील सुमारे ३० टक्के भाग महापुराच्या विळख्यात सापडला आहे. आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यत पावसाची संततधार सुरू आहे. पंचगंगा नदी धोकापातळीपेक्षा सहा फूट अधिक उंचीने वाहत आहे, तर शहराच्या मध्यभागातून वाहणारा जयंती नाला दुथडी भरून वाहत आहे. पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने पुराचे पाणी घुसलेल्या घर आणि इमारतींतून लोकांना बोटीचा वापर करून सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.  सांगली, कोल्हापूर शहरांतील हजारो पूरग्रस्त कुटुंबांची सरकारी शाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईच्या दूध-भाजी पुरवठय़ाला फटका

पंचगंगेचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गावरही आल्याने त्यावरून होणारी वाहतूक मंगळवारीही बंद होती. सांगली-कोल्हापुरातील या पुराने पुण्या-मुंबईकडे होणारी दूध आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीवरही परिणाम  झाला आहे.

कर्नाटकचे साह्य़

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यत पूरपरिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्याशी संवाद साधून विसर्ग वाढविण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यात आला असून पाण्याची पातळी खाली येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी सांगितले.

कोकणातही पूरस्थिती

रत्नागिरी : पावसाच्या तडाख्याने कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळुणात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) मंगळवारी दुपारी दाखल झाले आहे.

सध्या चिपळुणातील पूरपरिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी जिल्ह्य़ात ठिकठिकाणी पुराचे स्वरूप लक्षात घेता,  सावधगिरीचा उपाय म्हणून हे पथक सज्ज ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापकी चिपळूण तालुक्यात सर्वात जास्त, १७५ मिलीमीटर पाऊस पडला असून, खेड (१५५ मिमी), राजापूर (१४७),  मंडणगड आणि दापोली ( प्रत्येकी १३०), लांजा (१०४), संगमेश्वर (९७) गुहागर (७९) आणि रत्नागिरी तालुक्यातही (६४ मिमी) पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

गेले सुमारे दोन आठवडे अनेक वाडय़ा-वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने घरे, दुकाने, गोठे आणि सार्वजनिक मालमत्तेचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वेच्या काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही विलंबाने धावत आहेत. एकूणच कोकणातील जनजीवनावर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.   पावसाचा जोर राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर,  चिपळूण आणि खेड या तालुक्यांना सर्वाधिक बसला आहे.

माणगाव येथे शाळा कोसळली

अलिबाग- रायगड जिल्ह्य़ात पावसाचा कहर सुरुच आहे. अतिवृष्टीमुळे मंगळवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे महाकाय वृक्ष कोसळला, तर माणगाव तालुक्यातील वरक आदिवासी वाडीतील जिल्हा परिषदेची शाळाही पडली. सुदैवानी दोन्ही घटनांत जीवितहानी मात्र झाली नाही.

वृक्ष कोसळल्याच्या घटनेत एका मोटारीचे तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. मोटार पंक्चर झाल्याने त्यातील प्रवासी बाहेर पडल्याने ते थोडक्यात बचावले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा वृक्ष महामार्गावरून दूर करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.