कोल्हापूर, सांगली जिल्ह्यतील पावसाने थांबलेले दूध संकलन आणि पुणे-बेंगळुरू महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक यामुळे मंगळवारी मुंबई, पुणे या महानगरांना होणारा रोजचा सुमारे १० लाख लिटर दूधाचा पुरवठा ठप्प झाला आहे. पूरस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आणि रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत दूध संकलन होण्याची शक्यता कमी आहे .

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यतील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीसह अनेक नद्यांना महापूर आला आहे. जिल्ह्यत १११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे कोल्हापुरातील सर्व मोठय़ा आणि खासगी संघांना दूध संकलनाचा फटका बसला आहे. महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने ग्रामीण भागातून दूध संकलन होत नाही . त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याने गोकुळशिवाय अन्य उत्पादकांचे पाठवले जाणारे दूधही शहरात जाणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. गोकुळ संघ मुंबईला प्रतिदिन सुमारे ८० हून जास्त टँकरद्वारे ६.५० लाख लिटर दुधाचा पुरवठा करतो. पुण्यातही २ लाख लिटर दूध पुरविले जाते.