कोल्हापूर : आपल्याला शिवसेनेत नक्की सन्मानाची वागणूक मिळेल याविषयी शिवसैनिकाला आत्मविश्वास असतो. पक्षाचे निष्ठेने काम करून कोल्हापुरातून संजय मंडलिक यांच्यारूपाने भगवी पताका संसदेत पाठवा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना गटप्रमुख आणि बूथस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे येथे करण्यात आले होते. यावेळी रावते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भाजपच्या आमदार अमल महाडिक यांना प्रचारात सहभागी घेतले जाईल, असे स्पष्ट केले.

शिवसेना सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक म्हणाले, की गतवेळी पावणेसहा लाख मतांपर्यंत मजल मारून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर सहाशे गावांचा दौरा पूर्ण केला असून यावेळी विजय निश्चित आहे. गोकुळ मोडकळीस आणून गोकुळचा पैसा आमच्याविरोधात वापरला जात आहे, असा आरोप त्यांनी महाडिक यांच्यावर केला.

प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, गेल्यावेळी आपल्या मतदारसंघात ३० हजार मते कमी पडली. सेनेची हक्काची मते गेली कुठे? असा प्रश्न करुन त्यांनी साटलोटं चालणार नाही, असा टोला गटबाजीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना लगावला. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, की गोकुळच्या मल्टीस्टेटबाबत म्हणाले, सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या मालकीचा गोकुळ कोणाच्या तरी घशात जाऊ  देणार नाही. संघटीतपणे गोकूळ वरील हे आक्रमण थोपवणार आहे.

आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे,  महिला संघटक संज्योती मळवीकर यांचे भाषण झाले. माजी महापौर श्रध्दा जाधव, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह तालुका प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.

मंडलिक खासदार होईपर्यंत अनवाणी

आजरा तालुका शिवसेना उपप्रमुख संजय इसादे यांनी आपण संजय मंडलिक हे खासदार होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.