शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मात्र मी त्यांना मनोमन सॅल्यूट करतो. महाडिकांनी महाराष्ट्राचे नाव देशात पुढे नेले, अशा शब्दात दहशदवादविरोधी संघटनेचे अध्यक्ष मिनदरजितसिंग बिट्टा यांनी शहीद महाडिक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पोगरवाडी येथे शहीद संतोष महाडीक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काही दिवसांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मिनदरजितसिंग बिट्टा अशी मंडळी भेट देत आहेत. या मंडळींनी वीरपत्नी स्वाती, वीरमाता कािलदा व बंधूंची भेट घेतली.
बिट्टा पुढे म्हणाले, पंजाब मधील दहशदवादविरोधी पथकात काम करताना अनेक कटू प्रसंग आले. दहशतवादी कारवाया उखडून टाकण्यासाठी गव्हर्नर लॉ अमलात आणला. लोकसहभाग वाढवला, जनतेतील विश्वास वाढवला आणि त्यामुळे दहशतवाद कमी झाला.
या वेळी कर्नल महाडीक शहीद झालेल्या चकमकीची माहिती त्यांच्या समवेत असलेल्या जवानाने दिली. या माहितीनंतर बिट्टा यांनी शहीद महाडीक यांच्या कुटुंबीयांना कोणतीही अडचण आली तरी थेट माझ्याशी संपर्क साधावा ,मी सर्वतोपरी मदत करीन, असे सांगितले.
दरम्यान वीरपत्नी स्वाती यांनी, मला लष्करात अधिकारी होऊ संतोष महाडीक यांचे काम पूर्ण करायचे आहे. वयाची अट शिथिल करून मला प्रशिक्षण दिले तर मी लष्करात सेवा करेन, असे उद्गार काढले. माझी दोन्ही मुले लष्कराच्या सेवेत घालण्याचा माझा विचार आहे तर मला ही देशाची सेवा करायची आहे. शहीद महाडीक यांना कूपवाडा भागातील मुलांसाठी शिक्षण तसेच तिथे पर्यटन वाढवायचे होते. ते त्यासाठी प्रयत्न करत होते. ते प्रयत्नही मला करायचे आहेत, त्यासाठी सरकारने माझी मदत करावी, असे वीरपत्नी स्वाती महाडीक म्हणाल्या.