अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुकारलेला बेमुदत बंद मागे घेण्याचा निर्णय सराफी संघटनांनी सोमवारी पुण्यातील बैठकीत घेतल्याने मंगळवारी करवीरनगरीतील सराफी दुकाने तब्बल ४१ दिवसानंतर उघडली. बंद मागे घेतल्याने कंटाळलेले सराफ आज खुशीत होते. तर रोजगाराला पुन्हा सुरुवात झाल्याने कारागीर आनंदी होते. दागिन्यांची अतीव निकड असलेल्या ग्राहकांनी आज दिवसभर सराफ दुकानात गर्दी केली होती. ग्राहकांच्या वावराने सराफांच्या तिजोरीत बऱ्याच दिवसांनी लक्ष्मी चालून आली.
देशभरातील सराफांनी मागील दीड महिन्यापासून अबकारी कराविरुद्ध देशव्यापी मोहीम उघडली होती. सरकारी धोरणाविरुद्ध सराफ दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला होता. बंद मागे घेण्याची घोषणा काल करण्यात आली होती.
कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या कार्यालयात आज सभासदांची तातडीची बैठक होऊन दुकाने सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर सराफ दुकाने उघडण्यात आली. गुजरी पेठेसह अवघ्या सराफी दुकानी चाळीस दिवस नंतर चैतन्य खुलू लागले. सोने खरेदी अडल्याने कोंडी झालेल्या ग्राहकांनी पावले गुजरीकडे वळवली. ग्राहकांचा वावर सराफांना सुखावणारा होता.