|| दयानंद लिपारे

अपंगांच्या सर्वागीण विकासाचे आणि पुनर्वसनाचे कार्य कोल्हापुरातील ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेने हाती घेतले आहे. हे कार्य २५ वर्षांहून अधिक काळ अव्याहत सुरू आहे. हजारो अपंग या संस्थेत शिकले, वाढले आणि स्वतच्या वाटा निर्माण करून पुढे गेले. जात आहेत. आजही या संस्थेत शेकडो अपंगांना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांचे पुनर्वसन केले जाते. त्यांना स्वावलंबी करणारा काजू बी प्रकल्प कोकणात उभा राहिला आहे. तो वाढवण्यासाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे.

आपल्या मदतीला कोणी धावून येईल, दया दाखवेल अशी अपेक्षा न बाळगता अपंगांनी स्वाभिमानी व स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न करायचा असा दृष्टिकोन घेऊन संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हुरजुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपंगसेवेचे हे व्रत घेतले आहे. कोल्हापूरपासून सात किमीवर ‘हेल्पर्स’चा सेवाकार्याचा वेलू वाढतो आहे. ही संस्था म्हणजे अपंगांचे केवळ निवासस्थान नाही, तर त्यांच्या सर्वागीण विकासाचे केंद्र आहे. येथे त्यांच्या शिक्षणाची आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय आहे. शिवाय त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधीही आहेत. या संस्थेतील अपंग शेजारच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण अन्य सक्षम विद्यार्थ्यांसोबत घेतात.

अपंगांच्या विकासाचे आणि सेवेचे कार्य करताना ‘हेल्पर्स’ला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यापैकी प्रमुख अडचण आहे ती पैशांची. येथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत, शैक्षणिक साहित्याची खरेदी, कला-क्रीडा उपक्रमांसाठी निधीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शिक्षक, प्रशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनासाठीही निधीची आवश्यकता आहे. शिवाय प्रशिक्षणाची साधने जुनी झाली असल्याने दर्जेदार साधने घेण्यासाठी मोठा खर्च आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अपंगांना फिरता यावे यासाठी त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करणारी अद्ययावत बस दिली होती. असा मदतीचा आधार देणारे हात अनेक आहेत. पण, संस्थेपुढे कामाचा डोंगर आहे. तो सर करण्यासाठी निधीची चणचण आहे.

मुख्य म्हणजे संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात स्वप्ननगरी नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा करण्याचा निश्चय केला आहे. दान स्वरूपात मिळालेल्या १२ एकर जागेवर तो साकारतो आहे. दोन वर्षांपासून  ‘हॅण्डिहेल्प वेल्फेअर फाउंडेशन’ या कंपनीच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योगाचे काम सुरूआहे. या प्रकल्पात ६०० टन काजू बियांवर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. तशा प्रकारे त्याचा विस्तार केला जात आहे. त्यासाठी पुढच्या टप्प्यातील इमारत बांधकामासाठी तीन कोटी रुपये लागणार आहेत. त्यासाठी समाजातील दानशुरांनी हातभार लावणे आवश्यक आहे.