यंदा ऑगस्टमध्ये कोल्हापुरात पावसाने थमान घातले. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘नवशिक्षण प्रसारक मंडळा’च्या प्रशालेची इमारत त्यात पूर्णपणे कोसळली. आता भाडय़ाच्या इमारतीत शाळेचे वर्ग भरतात. मात्र, शाळेसाठी इमारत उभी करण्याचा निर्धार संस्थाचालकांनी केला असून, त्यास आर्थिक पाठबळाची गरज आहे.

पन्हाळ्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. पन्हाळगडावर बांधकामासाठी परवानगी नाही. मात्र, नगरपालिकेच्या हद्दीबाहेर असलेल्या भागामध्ये नानाविध प्रकारची बांधकामे होत आहेत. मोठय़ा शिक्षण संस्थांच्या भव्य वास्तू आकाराला येत आहेत. तिथे आर्थिकदृष्टय़ा सधन वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होते; पण गरीब, सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचे हक्काचे ठिकाण म्हणजे ‘नवशिक्षण प्रसारक मंडळा’ची प्रशाला.

पन्हाळ्याच्या पायथ्याशी बुधवारपेठ या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १९९२ मध्ये ‘कन्या हायस्कूल’ या नावाने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणारी प्रशाला सुरू झाली. पुढे मुलींसोबतच मुलांनाही शाळेत प्रवेश दिला जाऊ  लागला. १९९६ मध्ये शाळेला अनुदान मंजूर झाले. त्यानंतर शिक्षकांनी लोकसहभागातून पाच खोल्यांची इमारत बांधली. बहुतांश वर्षे शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शैक्षणिक आणि शालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात पावसामुळे इमारतीच्या दोन खोल्या कोसळल्या. यंदाच्या पावसामध्ये इमारतीतील उर्वरित तिन्ही खोल्या जमीनदोस्त झाल्या. सध्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाडय़ाच्या इमारतींमध्ये शाळेचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. अशा स्थितीत संस्थाचालक, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, शिक्षक यांचे स्वत:ची इमारत उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास पाठबळ देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.