सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत ठरावधारक सोबत असल्याने विजय आमचाच आहे. आम्ही दूध उत्पादकांना नफ्यातील ८५ ते ९० टक्के परतावा कसा देता येईल याबाबत प्रयत्न करू, असे मत विरोधी आघाडीने गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

धनंजय महाडिकांसारखा खोटे बोलणारा माणूस या राजकारणात शोधूनही सापडणार नाही, असेही सतेज पाटील यांनी म्हटले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका भाषणात आमचा एकही टँकर नाही, असे म्हटले होते. आम्ही पुराव्यासह त्यांना दाखवून दिले आहे. यामुळे त्यांचा हा खोटा चेहरा जनतेसमोर आला. आमची अभद्र युती म्हणत आहात. आम्ही दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र आलो आहे. तुमच्यासारखे टँकर वाचवायला नाही, असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले.

शेट्टींची भूमिका अनाकलनीय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत असल्याची भूमिका जाहीर केली. यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेट्टी यांच्याबाबत मला काही बोलायचे नाही. त्यांनी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याचे म्हटले. अशोक चराटी यांच्यावर काही स्थानिक राजकारणामुळे दबाव टाकला असावा. त्यांनी सुरुवातीला घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम राहतील, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली.  सत्ताधारी आघाडीने वाढवलेल्या सभासदांमुळे ४०० मतांनी विजय होईल, असे म्हटले होते. याबाबत मुश्रीफ म्हणाले, वाढीव सभासदांचे विश्लेषण साधे आहे. त्यांचे ४ संचालक आमच्याकडे आले. आमची ६०० मते नव्याने आली आहेत. जवळपास एक हजार मतांनी आमचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.