विधान परिषद निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मातबर उमेदवारांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चुरस कमालीची वाढली आहे. विद्यमान सदस्य महादेवराव महाडीक यांचा उमेदवारीचा पत्ता कापला गेला असला तरी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेस पक्षाने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही अर्ज दाखल केला आहे. उमेदवारीच्या स्पध्रेत असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे महापालिका गटनेते महेश सूर्यवंशी, स्वरूप महाडीक, ध्रुवती सदानंद दळवाई यांनीही अर्ज दाखल केले. महाडीक-पाटील यांच्यात खरी लढत होणार असून अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचा दावा केला. १२ डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून त्या दिवशीच स्पध्रेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीची कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाकडे असल्याने उमेदवारीची चुरस अखेरच्या क्षणापर्यंत रंगली होती. बुधवारी सकाळी उमेदवारीची कोंडी फुटली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा उमेदवारीचा ए.बी. फॉर्म सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मोठय़ा संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांसमवेत सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी डॉ.अमित सनी यांच्याकडे दाखल केला.
यानंतर प्रकाश आवाडे यांनीही काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. त्यांनी काँग्रेस पक्षाचा ए.बी. फॉर्म आपल्याला मिळेल असे सांगितल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण ढवळून निघाले ते आमदार महाडीक तेथे आल्यानंतर. काँग्रेसच्या उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर महाडीक निवडणुकीच्या िरगणात उतरणार का, यावर आज सकाळपासूनच उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्यांनीही कार्यकर्त्यांसमवेत येत नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांचे सुपुत्र ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडीक यांनीही अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या िरगणात भाजपानेही उडी घेतली असून पक्षाचे महापालिकेतील गटनेते महेश सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाडीक-पाटील यांचे विजयाचे दावे
महादेवराव महाडीक – आपण बंडखोरी केलेली नसून माझी उमेदवारी सर्वपक्षीय आहे. पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी सर्व पक्षीयांचा पािठबा असून त्यामध्ये राष्ट्रवादीचाही सहभाग असू शकतो. विरोधकांपेक्षा एक तरी मत अधिक घेऊन आपण नक्कीच विजय मिळवू.
सतेज पाटील – पक्ष नेतृत्वाने विधानपरिषद निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पात्रतेचा विचार केला असून त्यांचा विश्वास सार्थ ठरवताना विजय निश्चितपणे मिळवू. ३७० मतांपकी ३०० मते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे असल्याने विजय सुकर आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्या पाठिशी राहणार असल्याचे सांगितल्याने कसलीही अडचण वाटत नाही.