देशात सध्या धार्मिक उन्माद तथा सामाजिक ध्रुवीकरण वाढत असताना जाती-धर्माच्या भिंती तोडून सोलापूरच्या सतीश अशोक घोडके या शालेय विद्यार्थ्यांने मशिदीतील ‘अजान’ (बांग) स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला.
सोलापुरात शालेय स्तरावर झालेल्या अजान स्पर्धेत २९० स्पर्धकांतून सतीश घोडके हा सवरेत्कृष्ट स्पर्धक ठरला. सोलापूर सोशल असोसिएशन प्राथमिक व माध्यमिक शाळा व जमियत उलेमा-ए-हिंद सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या अजान स्पर्धेत घोडके याचा सहभाग हाच मुळात आश्चर्यकारक होता. शहराजवळ होटगी येथे राहणारा सतीश हा ख्रिसेंट इंग्रजी शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकतो. अजान स्पर्धेविषयीची माहिती वर्गात शिक्षकांनी दिली तेव्हा मुस्लिम विद्यार्थ्यांसह घोडके यानेही स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा शिक्षक क्षणभर अवाक् झाले. तेव्हा सतीश याने वर्गातच सुरेल आवाजात ‘अजान’ म्हणून दाखविली. शिक्षक प्रभावित झाले खरे; परंतु अजान स्पर्धेत सतीशने सहभाग घेण्यासाठी त्याच्या पालकांची संमती घेणे आवश्यक होते. शिक्षकांनी सतीशचे वडील अशोक घोडके यांच्याशी संपर्क साधून स्पर्धेची पूर्वकल्पना दिली. तेव्हा घोडके यांनी संमती दिली. स्पर्धेत सहभागी झाला असता ‘अजान’साठी सतीश अशोक घोडके असे नाव पुकारले गेले तेव्हा परीक्षकांसह इतर विद्यार्थी स्पर्धक व प्रमुख पाहुण्यांना धक्काच बसला. प्रत्यक्षात सतीशने आपल्या सुरेल स्वरात अजान म्हटली, तेव्हा अवघे सभागृह प्रभावित झाले. मुस्लिमेतर असूनही सतीशने म्हटलेली अजान सुखावणारी होती. अपेक्षेप्रमाणे त्यालाच सवरेत्कृष्ट स्पर्धकाचा मान मिळाला. विजापूरचे मौलाना रिझवान, मौलाना मुफ्ती शफीक, मौलाना अहमद व मौलाना मुर्तुजा यांच्या परीक्षक मंडळाने स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
सतीश घोडके हा धनगर समाजाचा. त्याजबरोबर संवाद साधला असता त्याने अजानविषयीची गोडी कशी लागली, याचे मर्म सांगितले. होटगी गावात आपण राहतो, त्या परिसरात मशीद आहे. या मशिदीतून सकाळ, दुपार, सायंकाळी व रात्री दिली जाणारी ‘बांग’ कानावर पडते. सुरेल स्वरातील बांग ऐकताना आनंद वाटतो. त्यातूनच आपणही बांग म्हणण्याचा छंद जोपासला. त्यासाठी मशिदीतही गेलो. बांग आत्मसात केल्यानंतर अधूनमधून मशिदीतही जाऊन बांग देऊ लागलो. त्याचे मशिदीतील मंडळींना कौतुक वाटले, असे सतीश सांगत होता. त्याचे वडील अशोक घोडके हे पोस्ट मास्तर असून होटगी या राहत्या गावातच ते नेमणुकीस आहेत. ते म्हणाले, सतीशला अजानविषयी विलक्षण आकर्षण आहे. त्याच्यावर धार्मिक पगडा नाही. केवळ आवड म्हणून घरात अधूनमधून पूजापाठ करतो. तो अभ्यासात हुशार आहे. बोलका आणि तेवढाच शांत स्वभावाचा सतीश घरातील सर्वाचा लाडका आहे. सोशल उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक अ. जब्बार शेख व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसीफ इक्बाल यांनी अजान स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून काम पाहताना घोडके याचा स्पर्धेतील सहभाग व त्याने प्राप्त केलेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस, ही बाब स्पर्धेची उंची वाढविणारी तर आहेच, परंतु सामाजिक सद्भावनेचा संदेश देणारी असल्याचे नमूद केले.