शालेय पोषणआहार योजनेत अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने घोटाळा होत असल्याचे प्रकरण येथे उघडकीस आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील वाटप पूर्ण होऊनही अतिरिक्त तांदळाच्या पोत्यांचा साठा मार्केट यार्ड परिसरातील ठेकेदार धनराज भुतडा यांच्या गोदामात आढळून आला. मापात पाप करणाऱ्या या घोटाळ्याची व्यापी मोठी असण्याची शक्यता वर्तवून हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी रविवारी याप्रकरणी आपण व िशगणापूर येथील ग्रामस्थ उद्या सोमवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ काढून तो खासगी पोत्यात भरून खुल्या बाजारात विकून मापात पाप करण्याचा गोरखधंदा प्रजासत्ताक सामाजिक संघटनेने उघडकीस आणला आहे. शाळांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदळाचे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील वाटप पूर्ण होऊनही भुतडा यांच्या गोदामात तांदळाच्या पोत्यांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिलीप देसाई हे सायंकाळी जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहार विभागाचे वरिष्ठ सहाय्यक पी. के. बोरकर व करवीर पंचायत समितीच्या अधीक्षक भारती कोळी यांना घेऊन या गोदामाकडे गेले. या ठिकाणी त्यांनी ठेकेदार भुतडा यांना नोव्हेंबर महिन्यातील तांदळाचे वाटप पूर्ण झाले असताना येथे तांदळाची पोती कशी शिल्लक आहेत, अशी विचारणा केली. यावर ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. गोदामातील पोत्यांचा जि.प.चे वरिष्ठ सहाय्यक बोरकर यांनी पंचनामा केला. यामध्ये ‘ एफसीआय’चे सील असलेली तांदूळ भरलेली २३९ पोती, तर रिकामी १२५ पोती आढळली. तसेच सरकारी सील नसलेली परंतु तांदळाने भरलेली ६२ पोतीही आढळली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे अहवाल पाठवून पुढील कार्यवाहीसाठी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली जाईल, असे पंचनाम्यामध्ये म्हटले आहे. भ्रष्टाचाराची साखळी मंत्रालयापर्यंत या गोदामातील वजनकाटे हे वैधमापन झालेले नाहीत. येथील कोणताही वजनकाटा हा शासनमान्य परवानगीचा नाही. एकंदरीत मंत्रालयापासून खालीपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी तयार झाली आहे. मुख्यमंत्री यात लक्ष घालणार आहेत की नाही, असा सवाल करून त्यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा ते शनिवारी कोल्हापुरात आल्यावर त्यांच्या गाडीच्या आडवे जाऊन जाब विचारू, असा इशारा दिलीप देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.