पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शुल्क व बस भाडय़ाचे पसे शाळेच्या खात्यावर जमा न करता परस्पर हडप करून शाळेतील महिला लेखापालाने शाळेची १ कोटी ४३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी अपर्णा रवींद्र बोरगांवे (वय ३०, रा. शारदा विहार, मंगळवार पेठ) हिला अटक केली. याबाबतची फिर्याद शाळेचे मुख्य अकौंटंट प्रदीप वसंत धुरी (वय ४०, रा. गोरेगाव मुंबई) यांनी दिली. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. बोरगांवे कळंबा येथे असणाऱ्या पोदार स्कूलमध्ये २०१० सालापासून अकौंटंट म्हणून आहेत. २०१३ पासून सन २०१६ पर्यंत अपर्णा यांनी विद्यार्थ्यांचे शुल्क, बस भाडय़ासह इतर जमा झालेले पसे आपल्या जवळ ठेवून १ कोटी ४३ लाख ७९ हजार ३७७ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले. अपर्णा यांनी ५२ लाख ३७ हजार ७५० रुपये शाळेस परत केले. बाकी रक्कम न दिल्याने शाळेने करवीर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून करवीर पोलिसांनी अपर्णा बोरगांवे हिला अटक केली.