शिक्षणाच्या बदलत्या भवतालाचा विचार करून सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्जनांची वजाबाकी अशी शिक्षणपध्दती स्वीकारणे गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान याचा प्रचार व प्रसार लोकहितासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले.

ज्येष्ठ विचारवंत, दिवंगत  आमदार अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी सा.रे.पाटील समाजभूषण पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. यावेळी श्रीमती पाटील यांच्या हस्ते माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख ११ हजार  रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप होते.

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या,आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानामुळे देशाची प्रगती होत आहे, हे नाकारता येणार नाही मात्र यामुळे सामाजिक व्यवस्था धोक्यात येऊ नये याची दक्षता घेणे जरूरीचे आहे. समाजव्यवस्था चांगली राहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. तज्ज्ञांचे चर्चासत्र राष्ट्रीय पातळीवर होऊन त्यातून नवी दिशा मिळू शकते. स्व.सा.रे.पाटील यांचे गतिशील आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच नेहमीच कार्य राहिले. डॉ.डी.वाय.पाटील यांचे शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून केलेले कार्य  जनमानसात चिरंतन राहणार आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ.डी.वाय पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रमुख वक्ते सुरेश द्वादशीवार  यांनी मनोगत व्यक्त केले. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख तथा दत्त साखर करखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी स्वागत केले.  विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

खासदार  राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार  कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर आदी उपस्थित होते.