कोल्हापूर : इचलकरंजी शहर आणि परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘एसटी सरकार गँग’चा म्होरक्या संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे हे नगरसेवक बंधूंसह त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये तेलनाडे बंधूंसह अक्षय राजेंद्र नेमिष्टे, सुंदर रमेश नेमिष्टे, राजू ऊर्फ राजेंद्र गजानन आरगे, गणेश बजरंग नेमिष्टे (सर्व शेळके गल्ली) व अजिंक्य उत्तम जामदार (नदी वेस नाका) यांचा समावेश आहे. तेलनाडे यांच्या एसटी गँगवर दुसऱ्यांतदा मोक्का कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी शहर व परिसरात अवैध व्यवसाय, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, भूखंड फसवणूक आदींसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, वकील पवन उपाध्ये यांच्यासह १९ जणांवर तीन महिन्यांपूर्वी पहिली मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तेलनाडे बंधू यांच्यासह उपाध्ये व अन्य संशयित अद्यपही फरारी आहेत.

त्यातच १४ जुलै रोजी नगरसेविकेचे पती नितीन लायकर यांचे बंधू पत्नीसह बाहेरगावी जात असताना त्यांचा अक्षय नेमिष्टे, राजू आरगे, सुंदर नेमिष्टे, गणेश नेमिष्टे व अजिंक्य जामदार या पाच जणांशी किरकोळ कारणावरून जोरदार वादावादी झाली होती. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊ न संशयितांनी लायकर यांच्या घरात घुसून तोडफोड करत लायकर यांच्यावरही कोयत्याने हल्ला झाल्याने डोळ्याला गंभीर इजा झाली. बंधू व आई यांनाही धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली होती. घटनेनंतर संशयितांनी पलायन केले होते.

नितीन लायकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी ‘आम्ही सरकार’ची माणसे असून आमच्या सरकारला तुमच्यामुळे त्रास झाला, असे म्हणत हल्ला केल्याचे लायकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी नगरसेवक तेलनाडे बंधूंसह यांच्यासह अक्षय नेमिष्टे, राजू आरगे, सुंदर नेमिष्टे, गणेश नेमिष्टे, अजिंक्य जामदार यांच्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलनाडे बंधू वगळता शिवाजीनगर पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे.

गुन्ह्यचा तपास पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.