शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असताना गुरुवारी झालेल्या अंतिम मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराची शिफारस न करण्याचा निर्णय निवड समिती सदस्यांनी घेतला असून तो इच्छुकांना चांगलाच दणका ठरला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची नियुक्ती बराच काळ रखडली होती. त्याबाबत चर्चा होऊ लागल्यानंतर हे पद भरण्याची हालचाल सुरू झाली. या पदावर शिक्षण क्षेत्रातील अनेक नामवंतांचा डोळा होता. त्यातून इच्छुकांची मोठी स्पर्धा लागून या पदाकरिता विद्यापीठाकडे एकूण २३ अर्ज प्राप्त झाले होते. छाननी समितीकडून त्यातील २१ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते.
या सर्वाना गुरुवारी मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. २१ पकी १३ उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. मुलाखती झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराची निवड न करता कुलसचिव पदभरतीकरिता पुन्हा जाहिरात करण्याची शिफारस निवड समितीने केली आहे. या निर्णयामुळे इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून नव्या भरतीकडे लक्ष वेधले गेले आहे.