कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच करवीर नगरीची निवडणूक भाजप आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप आणि वादामुळेच रंगली आहे. भाजपने ‘असंगाशी संग’ करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेने भाजपवर थेट गुंडगिरीचा आरोप केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत नागरी प्रश्न मात्र दुय्यम ठरले आहेत. युतीतील मित्रपक्षांच्या वादाचा फायदा उठविण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. कोल्हापूरकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा ठरलेल्या टोलच्या प्रश्नाचे सारे श्रेय शिवसेनेने स्वत:कडे घेत मतदारांना साद घातली आहे.

एकेकाळी करवीर नगरीत शेकापचे वर्चस्व होते. पुढे काँग्रेसने जम बसविला. राष्ट्रवादीने हातपाय पसरले. गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेना प्रभावी ठरली. राजकारणाचा पोत बदलत गेला तरी महापालिकेत महादेव महाडिक यांची सत्ता कायम राहिली. महाडिक हे विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार असले तरी स्वत:च्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून पालिकेचे राजकारण केले. गुंडगिरी, भाई, अवैध धंदे करणाऱ्यांना महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने बळ दिले, असा आरोप केला जातो. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सासुरवाडी पक्षाचा फज्जा उडाला, असे चित्र निर्माण होऊ नये म्हणून पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट ताराराणीशी हातमिळवणी केली. या मुद्दय़ावरच सारे राजकारण तापले आहे.
भाजप- महाडिक युती हेच लक्ष्य
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महादेव महाडिक व त्यांच्याबरोबर हातमिळवणी केलेल्या भाजपला प्रचारात लक्ष्य केले आहे. महादेव महाडिक हे कागदोपत्री काँग्रेसचे आमदार, पण ते पक्षाचा प्रचारच करीत नाहीत. महाडिक यांचे पुतणे धनंजय हे राष्ट्रवादीचे खासदार, पण तेसुद्धा राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसत नाहीत. महाडिक यांचे पुत्र ताराराणी आघाडीची सूत्रे सांभाळत आहेत. महाडिक यांच्याशी हातमिळवणी केल्याने शिवसेनेने भाजप आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. विशेषत: गुन्हेगारी व तूरडाळ हे दोन मुद्दे भ्रष्टाचार-महागाई याच्या विरोधात बोलणाऱ्या भाजपाला जड जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे चार महत्त्वाची खाती असल्याने पक्षाकडूनही कोल्हापूर महापालिका ताब्यात घेण्याचा आग्रह आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे तंत्र त्यांनी स्वीकारले आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी प्रयत्नशील
भाजप- ताराराणी आघाडीवर होणारे गुंडगिरीचे आरोप किंवा भाजप-शिवसेनेतील वाद याचा फायदा उठविण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीने विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाबरोबर आघाडी केली आहे. काँग्रेसची धुरा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे आहे. भाजप-शिवसेनेतील वादामुळे फायदा होईल, अशा पद्धतीने राष्ट्रवादीने नियोजन केले आहे. परंतु लाच घेताना राष्ट्रवादीच्या महापौरांना पकडण्यात आले होते. हा मुद्दा राष्ट्रवादीला त्रासदायक ठरू लागला आहे.

शहरातील समस्या
चार दशकात तसूभरही पुढे न सरकलेली हद्दवाढ, टोल, स्मार्ट सिटी, पंचगंगा नदी प्रदूषण, महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा हे महत्त्वाचे प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. मार्गी लागलेल्या प्रश्नाचे श्रेय घेण्याचा आटापिटा आणि रखडलेल्या प्रश्नासाठी विरोधकांना दूषणे असा बाणा सर्वच पक्ष, उमेदवारांनी अवलंबिलेला असल्याने आरोप-प्रत्यारोपाची राळ उढली असून नगरीच्या विकासाचा मूळ मुद्दा चेहरा हरवून बसला आहे. ‘स्मार्टसिटी’मध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला नाही यावरून सर्वच राजकीय पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

टोलवरून टोलवाटोलवी
राज्यात टोलवरून हिंसक संघर्ष झाला तो कोल्हापूरमध्ये. शिवसेनेने सुरुवातीपासूनच टोलच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. सत्तेत आल्यावर टोलला स्थगिती देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेऊन टोलबंदीचे श्रेय शिवसेनेला मिळेल अशी व्यवस्था केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ६० पेक्षा जास्त नाक्यांवरील टोल बंद करण्यात आला. टोलबंदीचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचा मुद्दा भाजपच्या वतीने मांडण्यात येत आहे.

छुपी आघाडी
राजकीय आखाडय़ात भाजप-ताराराणी आघाडीला छेद देण्यासाठी विरोधकांनी छुपी आघाडी केल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला अखेरच्या टप्प्यात वातावरण कसे बदलायचे हे ठाऊक असल्याने त्याआधारे महापालिकेतील गतवेळचे आकडे कायम ठेवण्याचे गणित आखले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी सहकारमंत्री पाटील यांनी जिल्हा बँकेतील घोटाळ्याचा मुद्दा आणून हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.