25 February 2021

News Flash

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. भारती वैशंपायन यांचे निधन

सांगीतिक वारसा असणाऱ्या कुटुंबात १ जानेवारी १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला .

(संग्रहित छायाचित्र)

जयपूर-अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ  शास्त्रीय गायिका, शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटय़शास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. भारती वैशंपायन यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६६ वर्षांंच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती अविनाश वैशंपायन, मुलगा केदार, मुली मीरा आणि मधुरा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. घरंदाज गायकीमधून प्रकटलेला त्यांचा प्रत्येक स्वर रसिकांच्या मनाची पकड  घेत असे.

सांगीतिक वारसा असणाऱ्या कुटुंबात १ जानेवारी १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला . वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच त्यांच्या हिंदुस्थानी संगीताच्या शिक्षणास सुरुवात झाली. एसएनडीटी विद्यापीठातून वैशंपायन यांनी संगीतात एम.ए. चे शिक्षण घेतले.  १९८५ मध्ये गंधर्व महाविद्यालयाने त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून त्यांनी देशभरात मैफिली गाजवल्या. हिंदुस्थानी रागांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. दुर्मिळ आणि प्राचीन रागांवर मैफिली करत त्यांनी त्याचे संवर्धन करीत हा वारसा पुढील पिढीकडे सोपवला.

आकाशवाणीसाठी गायन, मराठी संगीत नाटक यात त्या सक्रिय असत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘संगीत स्वयंवर’ने दिल्ली येथील ब्रुहनमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था येथे सर्वोत्कृष्ट नाटकसाठी प्रथम क्रमांक मिळवला होता. शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटय़शास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. गतवर्षी त्यांना डॉ. त्र्यंबकराव जानोरीकर संगीतभूषण पुरस्कार देण्यात आला होता. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईतर्फे त्यांना ‘गानहिरा’ ही पदवी मिळाली आहे. पंचगंगा स्मशानभूमी येथे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 1:07 am

Web Title: senior classical singer dr bharti vyasampayan dies abn 97
Next Stories
1 लोकराजा शाहूंनी कृतिशील आचरणाने सामाजिक परिवर्तन देशाला दाखवून दिले – शरद पवार
2 समाधी स्मारकाची शाहू महाराजांची ‘इच्छापूर्ती’ शंभर वर्षांनंतर
3 कोल्हापुरात आजी-माजी मंत्र्यांमध्ये वादाच्या ठिणग्या
Just Now!
X