लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी नंदू शांताराम जगताप याला तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी मंगळवारी एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजारांची शिक्षा सुनावली.
नंदू जगताप व पीडित मुलगी नजीकच राहतात. ती युवती २७ जून २०१२ रोजी सकाळी क्लासला गेली होती. याठिकाणी नंदुने तिला माझ्याबरोबर चल नाहीतर त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी देऊन वडणगे गावातून पळवून आणले. दरम्यान पीडित युवतीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याने शोधाशोध केली. पण ती न मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रात्री ९ नंतर नंदूने त्या युवतीस घरी सोडले. घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने नंदूने आपल्यासोबत छेडछाड केल्याचे सांगितले. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी याप्रकरणी ७ साक्षीदार तपासले.  पोलीस अधिकारी रोहीदास गवारी, गणेश मिरका, सुमित पाटील यांची साक्ष तसेच सरकारी वकील अशोक एन. रणदिवे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला.