स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण करण्याबरोबरच समाजाचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे काम राजर्षी शाहूमहाराज यांनी केलेल्या स्त्रीविषयक कायद्यांनी केले, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातील डॉ. नंदा पारेकर यांनी आज केले.
सरूड येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इतिहास विभाग (सरूड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमंत पद्माराजे स्मृती व्याख्यानमाले’त ‘राजर्षी शाहूमहाराजांचे स्त्री उन्नतीविषयक कार्य’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आय. बी. तांबोळी होते, तर संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि गोकुळच्या संचालिका अनुराधा पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पारेकर म्हणाल्या, तत्कालीन समाजव्यवस्थेत लोकांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे अवघड बाब होती. अशा परिस्थितीत राजर्षी शाहूमहाराजांनी विधवा आंतरजातीय विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, देवदासी प्रथा प्रतिबंध, कौटुंबिक छळ प्रतिबंध अशा अनेक महत्त्वाच्या कायद्यांची निर्मिती केली. या कायद्यांनी स्त्रियांच्या सबलीकरणाची वाट अधिक प्रशस्त केली. स्त्रियांना शारीरिक दु:ख, इजा, मानसिक क्लेश, भीती, सासू-सुनेचे भांडण, अवहेलना, मारहाण अशा प्रकारांमधून सोडवून न्याय प्रदान करण्यासाठी शाहूमहाराजांनी केलेले कायदेविषयक कार्य आजही अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
एस. ए. जगताप, जी.एच. आळतेकर, अमोल गायकवाड उपस्थित होते. बी. आर. गाडवे यांनी आभार मानले तर शैलजा शेटे व राधिका जाधव यांनी सूत्रसंचालन केले.