|| दयानंद लिपारे

कलेचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरातील शालिनी सिनेटोनचा मध्यवर्ती जागेतील भूखंड बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला राज्य शासनाने चाप लावला आहे.  शालिनी सिनेटोनच्या दोन भूखंडांवर हात मारण्याचा डाव महापालिकेतील कारभारी नगरसेवक आणि विकासकांनी संगनमताने आखला होता. शालिनी स्टुडिओ जागेबाबत कोल्हापूर महापालिकेने दिलेल्या आदेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्थगिती दिल्याने या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. शालिनी सिनेटोन वाचवण्यासाठी कंबर कसलेल्या चित्रपट महामंडळातील कलाकारांना आणि कोल्हापुरातील कलाप्रेमी नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी आता या जागेचे पुढे करायचे काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. उरलेल्या जागेत चित्रपट निर्मिती अशक्य असल्याने चित्रपट, कलाविषयक अन्य उपक्रम राबवण्याची कल्पना पुढे येत आहे. त्या साकारल्या जाव्यात अशीही कलारसिकांची अपेक्षा असली तरी त्यासाठी निधी कधी उपलब्ध होणार आणि या योजना साकारल्या कधी जाणार याचीही उत्तरे मिळण्याची निकड भासत आहे.

impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

भारतीय चित्रपटसृष्टीत कोल्हापूरचे स्थान महत्त्वाचे आहे. चित्रपट जगत खुलले ते पंचगंगा काठच्या कोल्हापुरात. चित्रपट निर्मिती आणि त्याला चालना देण्याची मोहिनी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पडली आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यालाही ती पडल्याचे इतिहास सांगतो. मुळात कोल्हापूर हे कलापूर म्हणून विकसित होण्यास- बहरण्यास राजघराण्याचे पाठबळ उल्लेखनीय आहे. कला-संस्कृतीच्या प्रगतीसाठी करवीर संस्थान नेहमीच कलाकारांच्या पाठीशी सह्य़ाद्री प्रमाणे ठामपणे उभे राहिले आहे. शालिनी सिनेटोन हा याच कला संवर्धनाचा एक भाग. छत्रपती राजाराम महाराज यांनी जयप्रभा स्टुडिओ स्थापन केला. तर राजभगिनी अक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकरात शालिनी सिनेटोन स्थापन केला. जयप्रभाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे, तर शालिनी सिनेटोनच्या उरल्या-सुरल्या जागेचे अस्तित्व टिकवून राहण्यासाठी धडपड सुरू आहे.  कोल्हापूरच्या चित्रपट इतिहासात नाव कोरले गेलेल्या शालिनी सिनेटोनच्या भूखंडांचे श्रीखंड लुटण्यासाठी डाव आखला. कोल्हापूर महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांनी गळ्यात गळा घालून कोटय़वधी रुपयांचा हा भूखंड विकासकांच्या घशात घालण्याचा उद्योग आरंभला, त्याला प्रशासनाची साथ मिळाली.

चित्तरकथा शालिनी सिनेटोनची

शालिनी सिनेटोनमध्ये चित्रपट निर्मिती गतीने झाली, पण नंतरच्या काळात हे प्रमाण कमी झाले. साहजिकच, या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भूखंडावर विकासकांचा डोळा न जाईल तर नवल. या भूखंडावर नजर ठेवून त्याची व्यावसायिक विल्हेवाट लावण्याच्या डाव आखला गेला. स्टुडिओची जुनी इमारत पाडली गेली. स्टुडिओच्या जागेवर असणारे बांधकाम पाडताना पाहून कलाकार व तंत्रज्ञांना अश्रू अनावर झाले. शालिनी सिनेटोनचे भूखंड क्रमांक ५ (सुमारे १४ हजार चौरस मीटर) व ६ (सुमारे २० हजार चौरस मीटर) काबीज करण्याची खेळी विकासक आणि महापालिकेतील कारभारी नगरसेवक यांनी रचली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सन २००५ मध्ये चित्रपट महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष यशवंत भालकर यांना शालिनी सिनेटोनची जागा कायमस्वरूपी स्टुडिओसाठी राहील, असे पत्राद्वारे कळवले होते. त्यानंतर महामंडळाने चित्रीकरणासाठी जागा आरक्षणाबाबतचा फलक स्टुडिओच्या बाहेर लावला होता. तरीही देशमुख यांच्या पक्षाचेच नगरसेवक त्यांचाच शब्द उखडून टाकण्यासाठी सरसावले होते.

वारसाहक्कात समाविष्ट असलेला आरक्षित भूखंड विकासकाकडे देण्याच्या हेतूने महापालिकेच्या सभेत फेरप्रस्ताव दाखल करण्याचे ठरले. कारभाऱ्यांनी आपल्याला मलई मिळवताना अन्य नगरसेवकांना काही हजारात गुंडाळण्याचा प्रयत्न केला. आपसूक लक्ष्मी कशी चालून आली, अशी शंका महालक्ष्मीचा निवास असलेल्या नगरीतील नगरसेवकांना आली. त्यांनी तळात जाऊन चौकशी केली तेव्हा कारभाऱ्यांनी पद्धतशीर चालवलेली लूट लक्षात आली. त्यातून वादाला तोंड फुटले. पाठोपाठ चित्रपट महामंडळाच्या पदाधीकारी, कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला. आणि महापालिकेला आपला निर्णय बदलावा लागला.

चित्रपट व्यवसायाचा शतक महोत्सव साजरा होत असताना कोल्हापूरच्या चित्रपटनिर्मितीची उज्ज्वल परंपरा सांगणाऱ्या शालिनी स्टुडिओचे लचके तोडण्याच्या कुटिल हालचाली झाल्या, पण हा डाव खेळणाऱ्यांवरच उलटला गेला. कलाप्रेमी जनतेने सर्वच जागा, किमान दोन भूखंडांचे अस्तित्व कायम ठेवावे, अशी केलेली मागणी मान्य झाली.

शासनाची कसोटी

शालिनी सिनेटोनचा विषय मंत्रालयापर्यंत निनादला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालिनी स्टुडिओ जागेबाबत कोल्हापूर महापालिकेने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यापासून ते खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आता शासनाला आपला निर्णय अमलात आणण्यासाठी काम करावे लागेल. शासकीय पातळीवरील जुना अनुभव बरा नव्हता. मध्यंतरी, स्टुडिओचा उर्वरित भूखंड विकसित करण्यासाठी नगरविकास विभागाकडे दाखल केलेले विकासकाचे अपील मान्य केले होते. भूखंड विकसित करण्यासाठी महापालिकेला मुंजरी देण्याची सूचना केली. नगरविकास विभागाकडे सादर केलेले विकासकाचे अपील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत मान्य केले होते. त्यावेळी पुन्हा एकदा विकासकाला भूखंड विकसित करण्याची संधी मिळाली होती. शालिनी स्टुडिओचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता बळावली होती. आता थेट मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने स्टुडिओ वाचण्याच्या आशा बळावल्या आहेत. शासनाचीच आता कसोटी लागणार आहे.

स्टुडिओ वाचणार, पुढे काय?

शालिनी स्टुडिओचे पुढे काय करायचे, याची उत्तरे आता कलाकारांना शोधावी लागतील. जीर्ण वास्तूत पुन्हा चित्रीकरण कठीण. नवे पर्याय शोधण्याची गरज असून त्याबाबतीत काही कलाप्रेमींनी संकल्पना मांडली आहे. या स्टुडिओत चित्रीकरण केलेले, स्टुडिओसाठी संघर्ष केलेले चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी कोल्हापूरची चित्रपट परंपरा जपणारे संग्रहालय व्हावे, पुण्याप्रमाणे जुने चित्रपट जतन करणारे अर्काइव्ह केंद्र व्हावे, त्यासाठी छोटेखानी चित्रपटगृह बांधण्यात यावे, रंकाळा तलावापासून स्टुडिओ जवळ असल्याने पर्यटकांना खेचून घेण्यासाठी साऊंड शो साकारण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.