शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार येत आहेत. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदाने चांगलीच उसळी घेतली आहे. आमदार हसन मुश्रीफ विरुद्ध खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने यांच्यातील संघर्ष उफाळला आहे. निवडणुकीसाठी आघाडी कोणाशी करायची हा कळीचा मुद्दा बनला आहे.

कागल नगरपालिकेच्या राजकारणाला मुश्रीफ यांना शिवसेना चालत असेल तर आमच्या भागातील विकास, राजकारण यासाठी भाजपशी युती केली तर बिघडले कोठे, असा सवाल उर्वरित तिघांनी करत मुश्रीफ यांना खिंडीत गाठले आहे. याच प्रमुख मुद्यावरून ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीतील मतभेद ताणले आहेत. याचा निकालावर परिणाम होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांसह नागरिकांतही सुरू झाली आहे. त्यामुळे तापलेले वातावरण थंड करण्याबरोबरच पक्षात ऐक्य राखण्याचे आव्हान पवारांसमोर असणार आहे. पवार यांनी जातीयवादी पक्षाशी आघाडी होणार नसल्याचे अगोदरच जाहीर केले आहे.

कोल्हापूरसारख्या पुरोगामी विचाराच्या जिल्ह्यात आल्यावर पवार आपले पुरोगामित्व जपणार की स्थानिक नेत्यांना त्यांच्या यशासाठी सोयीच्या वाटा मोकळय़ा करून देणार, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांचे दोन्ही दिवसांचे कार्यक्रम हे महात्मा गांधी व राजर्षी शाहूमहाराज यांच्याशी संबंधित असल्याने पवारांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या राजकीय वळणवाटांचा मार्ग निश्चित होणार असल्याने नेमके काय घडणार याकडे लक्ष वेधले आहे.