शरद पवार यांची खोचक टिपणी

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यारूपाने कोल्हापूर हे सत्तेचे उपकेंद्र बनले आहे. त्यांनी विरोधी पक्षांना निवडणूक लढवण्याचा सल्ला देऊ  नये. त्याऐवजी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, अशी खोचक टिपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे केली.

महसूल मंत्री पाटील यांनी गेल्या आठवडय़ात, भाजपाला सर्व निवडणुकात यश मिळत असल्याने विरोधकांनी आगामी निवडणूक लढवण्याच्या फंदात पडू नये .आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नये , असा सल्ला दिला होता . या विधानाचा समाचार पवार यांनी मंत्री पाटील यांच्या कोल्हापुरात  घेतला. ते म्हणाले, निवडणूक लढवाव्यात की नाही या बाबतचा  धोरणात्मक निर्णय संबंधित पक्ष घेत असतो . त्यांना पाटील यांनी फुकाचा सल्ला देऊ  नये. राज्यात मुख्यमंत्री सत्तेचे केंद्र असताना महसूल मंत्री हे उपकेंद्र बनले आहे . मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी कोठडय़ा रिकाम्या असल्याचे म्हटले होते . त्यांनी केवळ असे सांगण्याऐवजी करून दाखवावे , असे आव्हान पवार यांनी दिले . आयुष्यात  एकदाच संधी मिळते . त्याचा सकाळ, दुपार, संध्याकाळ लाभ घ्यावा,असा टोलाही पवार यांनी पाटील यांना लगावला.आगामी निवडणूक थेट लोकांमध्ये येऊ न निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान पवार यांनी पालकमंत्री पाटील यांना दिले. नाणारला १०  मे रोजी भेट

वादग्रस्त ठरलेल्या नाणार प्रकल्पाला १० मे रोजी भेट देणार आहे, असे सांगत पवारांनी या वादात उडी घेतली. नाणार प्रकल्पासाठी  कोकणात जमीन मिळाली नाही  तर हा प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री  सांगत आहेत. गुजरातला किंवा अन्य राज्यात हा प्रकल्प गेला तरी तो देशातच राहणार आहे. गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांना फटकारले.

शेट्टींशी जवळीक

शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार राजू शेट्टी यांनी दोन विधेयके संसदेत मांडण्याचे ठरवले आहे . त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांची बैठक २५ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केली आहे . या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे सांगत शरद पवार यांनी शेट्टी यांच्याशी सलगी वाढत असल्याचे संकेत दिले.