राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यांत बेरजेचे राजकारण घडले नाही. पक्षातील मतभेदाची जखम त्यांच्या दौऱ्यानंतरही चिघळतच राहिली. उलट, त्यांची पाठ वळून दिवस मावळायच्या आत कोल्हापूर महापालिकेतील आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती पक्षाच्या हातातून निसटली. या अनपेक्षित पराभवाने राष्ट्रवादीतील स्थानिक वादाने आणखी उसळी घेतली असून माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात वाद नव्याने सुरू झाला आहे .लोकसभा निवडणुकीसाठी एकजुटीने पक्ष सामोरे जाण्याची अपेक्षा असताना विसंवादाची दरी  आणखीनच रुंदावत चालली आहे. शरद पवार यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मुश्रीफ व महाडिक यांच्यातील वादाचे दर्शन घडले होते . महाडिक यांची भाजपशी जवळीक वाढू लागल्याने आपणच लोकसभा निवडणूक लढवू, असे विधान करून मुश्रीफ यांनी खळबळ उडवून दिली होती. हा तापलेला वाद पाहता पवार हे कोणाला कानपिचक्या देणार याकडे लक्ष वेधले होते. पण ज्यांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते ते संजय सदाशिवराव मंडलिक यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी पवारांच्या समक्ष जाहीर केला. यामुळे मंडलिक यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नाला खो बसला. मंडलिक यांनीही सेनेकडून लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

पवार महाडिकांना अनुकूल

संजय मंडलिक इतक्यात शिवसेना सोडण्याच्या विचारात नसल्याने राष्ट्रवादीला लोकसभेचा उमेदवार नक्की करणे गरजेचे बनले. अशा वेळी हातचे सोडून पळत्याच्या मागे जाण्यात फारसा अर्थ नाही, असे पवारांना जाणवले असावे. त्यामुळे त्यांनी मंडलिक यांचा समारंभ आटोपल्यानंतर महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. भाजपशी जवळीक साधत असल्याचा आरोप महाडिक यांच्यावर होत असतानाही पवारांचे स्वागत करताना महाडिक यांच्या समवेत महापालिकेतील भाजप- ताराराणी आघाडीचे नगरसेवक होते. त्यावरही पवारांनी काही भाष्य केले नाही. महाडिक यांचा दुसरा पर्याय लक्षात आल्याने पवारांनी महाडिक यांना उपदेश देण्याचे टाळले असावे.

खरे तर, पवार यांनी कोल्हापुरात येण्यापूर्वीच महाडिक यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा करून लोकसभेचे संकेत दिले होते. या घटना पाहता पवारांची लोकसभेची पसंती विद्यमान खासदार असणार हे आता स्पष्ट होत आहे. मात्र, महाडिक यांना मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा उघड विरोध असल्याने हा वाद कसा मिटवणार यावर लोकसभेची समीकरणे आकाराला येणार आहेत.

मुश्रीफांचे आक्षेप आणि विसंवाद

पवारांची पाठ वळल्यानंतरही राष्ट्रवादीतील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. उलट मुश्रीफ यांनी महाडिक यांना भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नेते ठरवले आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकात महाडिक यांनी विरोधात काम केले आहे, असा आक्षेपही मुश्रीफ यांनी नोंदवला आहे. आपल्याविषयी आदर ठेवणाऱ्या खासदार महाडिक यांनी त्यांना राष्ट्रवादीने खासदार केले असल्याने  पक्षाशी संबंध बिघडू नयेत असा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला आहे. महाडिक यांनी मात्र मुश्रीफ यांचे आरोप खोडून काढत आपण कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध काम केले नाही, तसे असेल तर त्याचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी असताना मुश्रीफ- महाडिक वाद राष्ट्रवादीच्या प्रगतीचे काटे मागे नेणारा ठरू शकतो, मात्र त्याचे गांभीर्य कोणालाच नसल्याने कार्यकर्ते मात्र हवालदिल झाले आहेत.

महापालिकेतील वादाच्या उपाख्यानाची भर

राष्ट्रवादीतील खासदार-आमदार यांच्यातील वादात भर पडली आहे ती महापालिकेतील उपाख्यानाची! कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादी यांची सत्ता आहे. महापौर, उपमहापौर आणि मलईदार स्थायी समिती ही महत्त्वाची पदे आलटून-पालटून घेण्याचा उभय काँग्रेसमध्ये अलिखित करार आहे. राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या दौऱ्यात मग्न असल्याचे पाहून भाजपने टाकलेल्या जाळ्यात राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे दोन सदस्य अलगद अडकले. या दोघांच्या मतामुळे भाजपचे आशीष ढवळे हे स्थायी समितीचे सभापती बनले आणि इकडे राष्ट्रवादीतील सत्तेच्या भ्रमाचा भोपळा फुटला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा निवडणुकीत पराभूत झाल्याने महापालिकेचे राजकारण हाताळणारे मुश्रीफ यांना हा जबर धक्का होता. या पराभवाचे खापर महाडिक कुटुंबावर फोडण्याचा प्रयत्न महापालिकेतील राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी केला.  मुश्रीफ यांनी कारभाऱ्यांचे कान उपटले, तर दोघा  फुटीर नगरसेवकांनी पक्षाच्या सर्वच स्थानिक नेत्यांचे शेलक्या शब्दात वस्त्रहरण केल्याने पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण या फुटीर नागरसेवकांविरुद्ध पक्षात असंतोष धुमसत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेळ पडेल तसे सोयीचे राजकारण कसे करतात यावर या घटनेने प्रकाशझोत पडला आहे. फूट पाडण्याच्या राजकारणामुळे कोल्हापूर महापालिकेत पुन्हा घोडेबाजाराला ऊत येण्याची चिन्हे आहेत. फुटीरांच्या मताच्या किमतीवर समाज माध्यमात आणि महापालिकेच्या वर्तुळात ‘कोटी’ रंगत आहे. स्थायी समिती निवडणूक ही त्याची झलक मानली जाते, याच मार्गाचा वापर करून भाजप उभय काँग्रेसचा सत्तेचा गड नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.