स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी दराची भूमिका स्पष्ट केल्यानंतर स्वाभिमानीचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यासाठी हात घातला आहे. हंगाम प्रारंभावेळी दुष्काळी स्थितीचे गंभीर सावट पडले होते. शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी, गुरुदत्त शुगर्स व हातकणंगले तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखान्यामध्ये सोमवारी ऊस गळीत हंगामाचा शुभांरभ झाला, तर जवाहर साखर कारखान्याचा हंगाम नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर मंगळवारी होणार आहे.
श्री दत्त साखर कारखान्याचा ४४वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ अध्यक्ष गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. या वेळी गणपतराव पाटील म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, या नसíगक आपत्तीस धर्याने तोंड द्यावे लागेल. कारखान्याकडे बारा लाख टन उसाची नोंद झाली असून त्याचे पूर्णत: गाळप होण्यासाठी शेतक-यांनी सहकार्य करावे. कारखान्याच्या वतीने चालवल्या जात असलेल्या दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमधील फीटर शाखेचा विद्यार्थी राहुल कोळी यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
श्री गुरुदत्त शुगर्स लि. टाकळीवाडेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव भ. घाटगे यांच्या हस्ते १२वा गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी झाला. कार्यक्रमास आमदार उल्हास पाटील, विजय भोजे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर धीरज घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे उपस्थित होते. तर शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील यांच्या हस्ते झाला.