दयानंद लिपारे 

खासदार राजू शेट्टी यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यापासून ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी होतील अशी शक्यता वर्तविली जात असली तरी आपल्या काही अटी मान्य झाल्याशिवाय आघाडीत जाणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शेट्टी यांच्या स्वाभिमानी आघाडीने अखेर कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी करून सूचक संदेश दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील नवनिर्मित शिरोळ नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश असलेल्या राजर्षी शाहू आघाडीने विजय मिळवला. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाची सुरू असलेली घौडदौड रोखण्याचे काम या निवडणुकीत झाल्याने विरोधकांना हुरूप आला आहे. शाहू आघाडीच्या यशाला पडद्याआडून शिवसेनेची मदत झाली आहे.

चार वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून बहुतांशी निवडणुकांमध्ये भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला. कोल्हापूर जिल्ह्य़ातही भाजपची प्रत्येक निवडणुकीत सरशी होत राहिली. कोल्हापूर महापालिकेचा अपवाद वगळता नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आदी निवडणुकांत उसाच्या फडात कमळ तरारून उगवले. नवनिर्मित आजरा नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सत्ता काबीज केली. यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला तर विरोधकांचे खच्चीकरण होत राहिले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील जनमनात असलेली नाराजी मतात परिवर्तित होत नसल्याने विरोधकांतही धास्ती निर्माण झाली होती. आता तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या टप्प्यावर नवे समीकरण मांडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार विरोधकांत सुरू होता. त्याला शिरोळ नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निमित्त मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. आणि काठावर का होईना यश मिळवत सत्तासंपादनाचे नवे समीकरण आकाराला आणून दाखवले.

भाजपला एकाकी पाडण्यात यशस्वी

यापूर्वी शिरोळ ग्रामपंचायतीत १७ सदस्य होते. नगरपालिकेतही तितकेच सदस्य निवडले जाणार होते. शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरुवातीपासून सुरू होते. भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना यांची महाआघाडी असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासमवेत शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी स्थापन केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील यद्रावकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी एकत्रित येऊन शाहू आघाडी स्थापन केली. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मदत केली. या आघाडीने सुरुवातीपासून आक्रमक आणि हायटेक प्रचारावर भर दिला. भाजपतील अनागोंदीचा फायदा उठवत जनमानसात भूमिका पोहचवली. भाजप सरकारच्या दोषांची चर्चा घडवून आणत ‘अच्छे दिना’च्या मोहजालात अडकू नका, असा प्रचार केला. याच वेळी भाजपच्या प्रचार नियोजनाची घडी विस्कटली होती. शिरोळ काँग्रेस तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हाती कमळ घेतलेले अनिल यादव यांच्या काही चुका भाजपाला भोवल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सभा घेऊनही यशाने हुलकावणी दिली.

शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीवरून दावे-प्रतिदावे याला रंग चढला आहे. ‘भाजप एकटा लढूनही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राजू शेट्टी यांच्या आघाडीच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आणला. विरोधक एकत्र असूनही आम्ही निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेत काय होणार हे स्पष्ट आहे,’ असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. हिंमत असेल तर स्वतंत्र लढा, असे खुले आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेट्टी हे एकत्र होतेच पण आदल्या रात्री शिवसेनाही त्यांच्यासोबत गेली याकडे लक्ष वेधून पाटील यांनी भाजपाची हवा कायम असल्याचा दावा केला. मात्र तो जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना मान्य नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरुवातीपासून आहे. पूर्वी काँग्रेस सत्तेत असताना विरोधकांची गट्टी व्हायची आता भाजप सत्तेत असल्याने विरोधक एकी साधत आहेत. शिवसेना सोबत असती तर भाजपचा दारुण पराभव झाला असता, असा युक्तिवाद मुश्रीफ यांनी केला आहे.