19 October 2019

News Flash

कोल्हापुरात शिवजयंती उत्साहात

विविध मंडळांतील तरुणांनी पन्हाळ्यासह  इतर गडकोट किल्लय़ांवरून वाजतगाजत शिवज्योती आणल्या.

शिवजयंती उत्सवानिमित्त कोल्हापुरात सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये केरळी कलाविष्कार सादर करण्यात आले. (छाया - राज मकानदार)

पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणुका

कोल्हापूर : ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा जयघोषात सोमवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांतील तरुणांनी पन्हाळ्यासह  इतर गडकोट किल्लय़ांवरून वाजतगाजत शिवज्योती आणल्या. सायंकाळी हाती भगवे झेंडे घेऊ न पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत आबालवृद्ध उत्साहाने सहभागी झाले होते. शहरात सर्वत्र लावलेल्या भगव्या झेंडय़ांनी अवघे शहर शिवमय झाले होते.

विविध मंडळांच्या, संस्थांच्या,तालमीच्या शिवभक्तांनी ठिकठिकाणी फुलांनी सजवलेल्या पाळण्यांचे पूजन करुन जन्मकाळ सोहळा उत्साहात करण्यात आला. उपनगरासह विविध मंडळांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजप्रबोधनपर देखाव्यांचे वेगळेपणही जपण्यात आले.

शिवाजी चौकात अभिवादन

पारंपरिक शिवजयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी आमदार राजेश क्षीरसागर, महापौर सरिता मोरे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. जन्मकाळ सोहळ्यानंतर पेढे, साखर वाटप करण्यात आले.

मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवाअंतर्गत शिवशाहीर संजय जाधव व शाहिरी पथकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिवरायांचे गुप्तहेर बहिर्जि नाईक यांच्या कार्याविषयी माहिती देणाऱ्या गोंधळ कार्यRमाचे सादरीकरणही करण्यात आले होते. सायंकाळी जल्लोषपूर्ण मिरवणूक काढण्यात आली.

मिरजकर तिकटी येथून शिवभक्तांच्या प्रचंड गर्दीत समाजप्रबोधनपर फलकांसह, देखाव्यांसह शहरातील प्रमुख मार्गांवरुन ही मिरवणूक काढण्यात आली.

संयुक्त जुना बुधवार पेठेतर्फे शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मार्गांवरुन शिवरायांच्या जयघोषात रॅली काढण्यात आली. शिवजन्मकाळ सोहळा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी बिंदू चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

संयुक्त रविवार पेठेतर्फे बिंदू चौकात उभारण्यात आलेला चित्ररथ तांत्रिक देखावा आणि एलईडी वॉल हे मोठे आकर्षण ठरले. शिवशाहिरांच्या पोवाडय़ांनी शिवकाळचा इतिहास जागवला. पारंपरिक लवाजम्यासह सामील झालेल्या केरळच्या वाद्यवृंदामुळे मिरवणुकीत वेगळाच उत्साह होता. उत्तरेश्वर पेठ संयुक्त शिवजयंती उत्सावानिमित्त भागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार उपनिरीक्षक सुधीर पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

First Published on May 7, 2019 2:29 am

Web Title: shiv jayanti festival celebration in kolhapur