केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात सोमवारी सत्तेतील शिवसेना तसेच विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने ताराराणी पुतळय़ाजवळ चक्का जाम केले, तर राष्ट्रवादीने मोर्चा काढून दुचाकींवर अंत्यसंस्कार केले.

इंधन दरवाढीविरोधात विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने मोर्चा काढला. जनता दलानेही या आंदोलनात भाग घेतला. तर आता केंद्र व राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही या आंदोलनात उडी घेतली आहे.

शिवसेनेचा रास्ता रोको

इंधन दरवाढी विरोधात कावळा नाका येथे शिवसेनेचा रास्ता रोको करत जोरदार निदर्शने केली. यामुळे या मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत झाली.  इंधनदरवाढीचा आकडा आता शंभरी पार करतो की काय, असे भीतीचे सावट सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आहे. ही दरवाढ तत्काळ मागे घ्या, अन्यथा तीव्र करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सरकारला दिला. त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शुभांगी पोवार, शिवाजीराव जाधव, रवि चौगुले, दिलीप देसाई, जयश्री खोत, दिनेश परमार आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचा मोर्चा

जुलमी पेट्रोल, डिझेल दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. पेट्रोल दरवाढीमुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रतीकात्मक दुचाकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पेट्रोल दरवाढीविरोधात घोषणाही देण्यात आल्या. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पेट्रोल ७० रुपयांच्या पुढे गेले नाही. पण सध्या रोज दरात वाढ होत असून ८७  रुपयांपर्यंत पोहाचले आहे. तेलाचे दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम म्हणजे जनतेला  महागाईची झळ  बसत आहे. ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चाद्वारे करण्यात आली. या वेळी मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, जी. डी. पाटील, सुनील कारडे, दत्ता गाडवे, सुरेश पाटील, राजाराम कासार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

((   इंधन दरवाढी विरोधात कावळा नाका येथे शिवसेनेचा रास्ता रोको केल्याने या मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत झाली.  ))