शिवसेनेची मागणी
कागल नगरपालिका निवडणुका भयमुक्त होण्यासाठी कागल शहर संवेदनशील म्हणून जाहीर करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच आमदार हसन मुश्रीफ समर्थक भय्या माने व प्रकाश गाडेकर यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी अशी मागणीही केली.
या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, सध्या कागल नगरपालिका निवडणुकीवर भयाचे व दहशतीचे सावट आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर भय्या माने व प्रकाश गाडेकर निवडणूक निर्णयप्रक्रियेत दबाव आणत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या दबावाला न जुमानता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कागल तहसीलदार यांच्याबाबतही असाच प्रकार घडला. भय्या माने व प्रकाश गाडेकर यांच्या दहशतीमुळे कागलमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे. यामुळे भय्या माने, प्रकाश गाडेकर यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिसांनी तत्काळ मंजूर करावा अशी मागणी केली.
विजय देवणे यांनी कागल नगरपालिका निवडणूक भयमुक्त होण्यासाठी कागल शहर संवेदनशील जाहीर करून जास्तीचा पोलीस बंदोबस्त तनात करावा. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे अशी मागणी केली. शहरप्रमुख शिवाजी जाधव, प्रकाश पाटील, सुधीर राणे, अनिल कांबळे, चंद्रकांत भोसले, दिलीप सूर्यवंशी, नीलेश देवणे आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2016 1:59 am