18 January 2019

News Flash

कोल्हापुरात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

महापौरपदासाठी हेच सूत्र

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत अवलंबलेल्या ‘ठाणे पॅटर्न’ची चाचपणी सध्या कोल्हापुरात सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे नेते एकत्र येत त्यांनी आताच शिवसेनेचे संजय सदाशिवराव मंडलिक यांच्यामागे आपली शक्ती उभी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि संजय मंडलिक या परस्परविरोधी शक्तींच्या युतीने जिल्ह्य़ातील आगामी राजकारणाची वाटचालही स्पष्ट झाली आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या दोघा माजी मंत्र्यांनी या युतीची घोषणा केली आहे. भाजपला शह देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पडद्याआडून समझोता केल्याने जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांत हाच ‘पॅटर्न’ कायम ठेवण्याचा विचार सध्या या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून बोलला जात आहे.

महापौरपदासाठी हेच सूत्र

कोल्हापूर महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीसाठी हाच ‘ठाणे पॅटर्न’ वापरला जात काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या बरोबर सेनेने युती केली आहे. पालिकेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर भाजप सेना आजवर विरोधी बाकावर बसत होते. मात्र या निवडणुकीत सेनेने भाजपाची साथ सोडत थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपले मतदान केले आहे. सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमताइतकी ४४ मते असताना शिवसेनेची ४ मते आणखी मिळाल्याने या नव्या आघाडीचा जन्म कोल्हापूर महापालिकेत शुक्रवारी झाला. त्यातून महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती यवलुजे, तर राष्ट्रवादीचे सुनील पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यांनी भाजप-ताराराणीच्या उमेदवारांचा १५ मतांनी पराभव करीत नव्या आघाडीची ताकद दाखवून दिली. नवी आघाडी जिल्ह्य़ाच्या राजकारणावर परिणाम करण्याची शक्यता आहे.

First Published on December 23, 2017 1:29 am

Web Title: shiv sena congress and ncp alliance in kolhapur